अधिकाऱ्यांनो, स्वच्छता राखा!
By admin | Published: November 6, 2014 12:26 AM2014-11-06T00:26:01+5:302014-11-06T00:39:35+5:30
स्वच्छ भारत मिशन : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडे
कोल्हापूर : सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक, कार्यालयीन व आसपासचा परिसर स्वच्छ राखण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, बुधवारी येथे केले. स्वच्छतेबाबत कार्यालयीन स्तरावर जनजागृती निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शासकीय विश्रामगृह येथील शाहू सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १४ ते १९ नोव्हेंबर २०१४ (जागतिक शौचालय दिन) या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात आयोजित सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, स्वच्छता एक संस्कार असून, बालपणापासूनच स्वच्छतेचे संस्कार होणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर हा संस्कार रुजविण्यासाठी अभियानाच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बालकांना स्वच्छतेचे संदेश, हात धुणे तसेच प्रचार प्रसिद्धीसाठी त्यांची दूत म्हणून नेमणूक करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, यापूर्वीही विविध अभियानांच्या माध्यमातून सरकारी स्तरावर स्वच्छतेचा पुरस्कार करण्यात आला होता. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक, कार्यालयीन व आसपासचा परिसर स्वच्छ राखण्यावर भर द्यावा. यावेळी केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छता मोहीम व सांसद आदर्श ग्राम योजना यांची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियान व बालस्वच्छता अभियान राबविण्याबाबत सादरीकरण केले. यामध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान, कार्यालयीन स्वच्छता मोहीम, तसेच स्वच्छता अभियानांतर्गत येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळीनिवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, कागलच्या प्रांताधिकारी मोनिका सिंह, इचलकरंजीच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन. एम. वेदपाठक, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आदर्श गावांसाठी...
सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राजगोळी खुर्द (ता. चंदगड) व पेरिड (ता. शाहूवाडी) या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये शिक्षण, बांधकाम अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शाहू सभागृहात ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राजाराम माने बोलत होेते. शेजारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, तर समोर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.