‘ईएसआयसी’साठी कोल्हापुरात येणार अधिकाऱ्यांची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:54 AM2019-07-09T11:54:57+5:302019-07-09T11:56:32+5:30
येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.
कोल्हापूर : येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.
ताराबाई पार्क येथील ईएसआयसी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी संसदेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी १0 कोटी रुपये खर्चून हे ईएसआयसी रुग्णालय बांधण्यात आले. या चार जिल्ह्यांतील सभासद कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे सात लाखांपर्यंत आहे. या सभासदांवर अवलंबून असलेल्या परिवारासह सुमारे ३0 लाख रुग्णांना हे रुग्णालय उपयोगी ठरणारे आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रतिमहिना ठरावीक रक्कम त्यांच्या पगारातून या रुग्णालयाकरिता वर्ग केली जाते.
वर्षाकाठी ही रक्कम सुमारे ८५ कोटी रुपये इतकी होते. या रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सर्व वॉर्डरुमला कुलूप लावण्यात आली आहेत. वापर नसल्याने हे रुग्णालय कबुतर, वटवाघूळ, भटक्या श्वानांचा निवारा बनले असल्याचे खासदार मंडलिक यांनी या प्रश्नातून मांडले. त्यावर १५ दिवसांमध्ये ईएसआयसी रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांना पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यातील आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री गंगवार यांनी दिली.
पूर्ण कार्यक्षमतेने रुग्णालय सुरू व्हावे
कर्मचारी सभासदांकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही या रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे, एमआरआय, पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी व इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा कामगारांना मिळत नाहीत. हे रुग्णालय सर्व सोईसुविधांसह पूर्ण कार्यक्षमतेने सुरू व्हावे; यासाठी त्याबाबतचा प्रश्न संसदेत मांडला असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
माहितीसह व्हिडीओ पाठविला
संसदेतील अधिवेशनात खासदार मंडलिक यांनी ईएसआयसी रुग्णालयाबाबतचा मांडलेला प्रश्न आणि त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली ग्वाही याची माहिती माध्यमांना पत्रकाद्वारे दिली. त्याबाबतचा व्हिडीओदेखील त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविला. दरम्यान, अशा पद्धतीने माजी खासदार धनंजय महाडिक हे त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांची माहिती माध्यमांना देत होते.