Kolhapur- अधिकारीच विसरले ड्रील; आयजी तपासणीत करवीर, गडहिंग्लज पोलिस नापास
By उद्धव गोडसे | Updated: December 28, 2023 17:51 IST2023-12-28T17:51:12+5:302023-12-28T17:51:43+5:30
खुलासा मागवला, कामकाजावर ओढले ताशेरे, अधिका-यांना प्रशिक्षणाला पाठविण्याचा आदेश

Kolhapur- अधिकारीच विसरले ड्रील; आयजी तपासणीत करवीर, गडहिंग्लज पोलिस नापास
कोल्हापूर : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलेल्या पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीत करवीर आणि गडहिंग्लज पोलिस ठाणे नापास ठरले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्यासह दोघांना कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षणाला पाठविण्याचा आदेश आयजी फुलारी यांनी दिला आहे. यामुळे करवीर आणि गडहिंग्लज पोलिस ठाण्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यांची तपासणी केल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणजेच आयजी सुनील फुलारी यांनी काही पोलिस ठाण्यांची वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान करवीर आणि गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या कारभारात गंभीर त्रुटी आढळल्या. याबाबत आयजी फुलारी यांनी दोन्ही पोलिस ठाण्यांना पत्र लिहून खुलासा मागवला.
करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २१९ नागरिक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी याची स्वतंत्र नोंदवही ठेवली नाही. सीसीटीएनएस प्रणालीतून प्रती काढून त्याचे गठ्ठे बांधून ठेवले आहेत. मुद्देमाल निर्गतीची कामे प्रलंबित आहेत. काही मुद्देमाल १९७४ पासून पोलिस ठाण्यात पडून आहे. मुद्देमालाची वर्षनिहाय मांडणी केलेली नाही.
तपासणीदरम्यान पोलिस निरीक्षक अरविंद काळे आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव स्कॉड ड्रील विसरले. कार्यालयीन कामकाजात सुधारणा करणे आणि व्यावसायिक कौशल्य वाढीसाठी या दोन्ही अधिका-यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा आदेश आयजी फुलारी यांनी पत्राद्वारे दिला आहे.