बांधकामे, सफाईवरून अधिकारी फैलावर
By admin | Published: July 13, 2016 12:21 AM2016-07-13T00:21:57+5:302016-07-13T00:40:38+5:30
अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी : महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत नगरसेवक संतप्त
कोल्हापूर : शहरातील नाल्यांवरील बांधकामे, चेंबर्स, नालेसफाईवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत डोळेझाक करून कारभार केल्याचा आरोप केला. नाले अरुंद होऊन पाणी रस्त्यांवर, भागाभागांत, घरांत शिरल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नाल्यांवर अशा पद्धतीने बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांना नोटिसा देऊन काढून टाकावे, अशा संतप्त भावना बैठकीत उमटल्या.
शहरात पूरपरिस्थितीबाबत आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या ताराराणी सभागृहात महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी नालेसफाई झाली नसतानाही सफाईचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्यांच्या निषेधार्थ महासभा बंद पाडण्याचा इशाराही यावेळी शारंगधर देशमुख यांनी दिला.
स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, उपमहापौर शमा मुल्ला, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शारंगधर देशमुख, किरण नकाते, नियाज खान यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. शहरातील नालेसफाई न झाल्याबरोबरच नाल्यांवरील बेकायदेशीर बांधकामांबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. २००५ इतकी पुराची पाणीपातळी नसतानाही संपूर्ण शहर जलमय झाले आहे. त्यामुळे नाले, चॅनेल सफाईचा फार्स अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरात पूरजन्य परिस्थिती उद्भवल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरांत, इमारतींमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. शहरातील नाले वळविणे, नाल्यांवर बांधकाम, उंची वाढविल्यामुळे रस्त्यांवर पाणी आले आहे. अशा परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा काढाव्यात. आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी फोन घेत नाहीत; त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, अशाही सूचना यावेळी मांडल्या. खानविलकर पेट्रोल पंप परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. तेथेही बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशाही सूचना मांडल्या.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी, मागील पुराचा विचार करून यंदा ३९ पूरबाधित ठिकाणे निश्चित केली असून, तेथील कुटुंबांचे स्थलांतरण व त्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्याचे सांगितले. या बैठकीस महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, परिवहन समितीच्या सभापती लाला भोसले, राजसिंह शेळके, प्रवीण केसरकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, संजय भोसले, संजय सरनाईक, आदी अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची पाठराखण नको
प्रत्येक अधिकाऱ्याचा खुलासा समाधानकारक नसल्याने नगरसेवक संतप्त झाले. त्यावर उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे अधिकाऱ्यांची बाजू घेऊन बोलताना त्यांच्यावरही काही पदाधिकारी संतापले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केलात तर केलेल्या कामाचे पितळ उघडे पडेल, असेही ते म्हणाले.
दोन नगरसेवकांच्या घरांत पाणी
शहरात प्रत्येकाच्या घरात पाणी घुसले आहे. नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या वांगी बोळामधील घरात पाणी शिरले असून ते पाणी काढत बसल्याने बैठकीस येऊ शकले नाहीत, तर राजसिंग शेळके यांच्याही घरात नाल्याचे पाणी शिरल्याची माहिती गटनेते विजयराव सूर्यवंशी यांनी बैठकीत दिली.
अधिकारी घरात, नगरसेवक भागात!
शहरात चौकाचौकांत, घरांत पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी अधिकारी केबिनमध्ये अन् घरांत हातावर हात धरून बसले आहेत अन् नगरसेवक मात्र भागाभागांत, घरांत शिरलेले पाणी काढताहेत. त्यामुळे अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तातडीने काढून टाकावे, अशी संतप्त सूचना विजय सूर्यवंशी यांनी मांडली.
चॅनेलमध्ये फळ्या अन् बांबू
नगरसेवकांच्या आरोपांच्या फैरी सुरू असताना ‘आयआरबी’ने तयार केलेले चॅनेल अरुंद असल्याने त्याची सफाई करता येत नसल्याचा खुलासा राजेंद्र पाटील यांनी केल्याने त्यांच्यावर अनेक नगरसेवक तुटून पडले. या चॅनेलमध्ये फळ्या अन् बांबू असल्याचे सत्यजित कदम यांनी निदर्शनास आणून दिले.