Kolhapur: कळंबा कारागृहात सापडेल्या मोबाइल प्रकरणात अधिकारी, कर्मचारी?, संशयितांची नावे होणार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:13 PM2024-04-15T17:13:46+5:302024-04-15T17:14:16+5:30

खुले मैदान, स्वच्छतागृह, भीतींत सापडले मोबाइल

Officials, staff in mobile case found in Kalamba prison in kolhapur, The names of the suspects will be revealed | Kolhapur: कळंबा कारागृहात सापडेल्या मोबाइल प्रकरणात अधिकारी, कर्मचारी?, संशयितांची नावे होणार उघड

Kolhapur: कळंबा कारागृहात सापडेल्या मोबाइल प्रकरणात अधिकारी, कर्मचारी?, संशयितांची नावे होणार उघड

सचिन यादव

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात सापडलेल्या ५० हून अधिक मोबाइल प्रकरणात कारागृहातीलच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सापडलेले मोबाइल खुली जागा, भिंतीत, स्वच्छतागृहात आणि काही बरॅकच्या कोपऱ्याजवळ सापडले आहेत. जमिनीत सुमारे एक फूट खोल जागेत लपवून ठेवल्याचेही उघड झाले आहे. या मोबाइलचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासणीचे काम चौकशी पथकाने सुरू केले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधितांचा सहभाग स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बाराजणांच्या पथकाने कारागृहातील या प्रकरणाची गांभीर्याने तपासणी सुरू केली आहे.

कळंबा कारागृहात सापडलेल्या मोबाइलची जबाबदारी कोणत्याही एक कैद्याने घेतलेली नाही. मोबाइल आले कुठून, कोणी दिले, कैद्यांचा सहभाग याची माहिती कारागृह प्रशासनाला सापडलेली नाही. मात्र, या मोबाइल प्रकरणात कारागृहातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्य प्रवेशद्वारच कैद्याची कडक तपासणी केली जाते. मात्र, कारागृहाच्या भिंतीवर बरॅकसमोर फेकलेले मोबाइल कैद्यांनी परिसरात लपविले आहेत.

हे लपविताना २४ तास पहारा देणारे कर्मचारी आणि सीसीटीव्हीत संशयित हालचाली कैद झाल्याची शक्यता आहे. बाराजणांच्या पथकाने मोबाइलच्या सीडीआरमधून कोणाला कॉल केले आहेत. त्यामध्ये कारागृहातील काही अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे का, याची तपासणी सुरू केली आहे. मोबाइल आणल्याचे कैद्यांनी मान्य केले नाही. त्यामुळे अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांनी सुरू केले आहे.

अँलन स्मार्ट फोनची आजपासून सुरुवात

कैद्याच्या बरॅकसमोर अँलन स्मार्ट फोन सोमवारी (दि. १५) बसविण्यात येणार आहेत. यामध्ये २२१२ कैद्यांपैकी ५०९ कैद्यांची पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. या कैद्यांनाच हा स्मार्ट फोन वापरता येणार आहे. त्यांच्याकडून तीन क्रमांकाची नोंद केली आहे. कारागृह कर्मचाऱ्यांच्या समोरच त्यांना इतरांसोबत संवाद साधता येईल. कैद्याचे बोलणे संशयास्पद वाटल्यास त्याचा सीडीआर मागविला जाणार आहे.

कपड्यातही मोबाइल

विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाइलची तपासणी सुरू असताना दोन ते तीन कैद्यांनी वाळत घातलेल्या कपड्यात मोबाइल लपविल्याचे उघडकीस आले. त्यावेळी हे कपडे आमचे नाहीतच, असा खुलासा कैद्यांनी त्यांच्यासमोर केला. बरॅकच्या कोपऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीतही काही गुंडाळलेले मोबाइल सापडले आहेत. मोबाइल तपासणीची ही मोहीम दिवसरात्र सुरू होती.

कळंबा कारागृह

  • न्यायाधीन बंदी १३५२ पुरुष, ४४ महिला
  • सिद्धदोष ७९४ महिला २१
  • मोका २०३
  • परदेशी ७
  • एकूण २१४७ महिला ६५

कळंबा कारागृहात कैद्यांकडे मोबाइल असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. जप्त केलेल्या मोबाइलच्या सीडीआरवरून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये कारागृहातील कोणाचा समावेश असल्यास कारवाई केली जाणार आहे. - स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे
 

क्लीन स्वीप मोहिमेतंर्गत ५० हून अधिक मोबाइल सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुमारे सहा फूट उंच जाळीचे कंपाउंडचे काम सुरू आहे. कारागृहाच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरातील तटबंदीवर ही जाळी बांधण्यात येत आहे. - शामकांत शेडगे, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

Web Title: Officials, staff in mobile case found in Kalamba prison in kolhapur, The names of the suspects will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.