कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:06+5:302021-08-28T04:27:06+5:30

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू कृषी तंत्र ...

Offline admission process for Agricultural Technology Diploma course started | कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Next

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू कृषी तंत्र विद्यालय (कसबा बावडा) या शासकीय अनुदानित कृषी विद्यालयात आणि तळसंदे, दत्तवाड, श्री सिद्धगिरी संस्था कणेरीमठ, कागल, परिते, कसबा तारळे, गारगोटी येथील विद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून दोन वर्षे मुदतीचा विनाअनुदानित तत्त्वावर कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम आहे. या सर्व कृषी तंत्र विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शाहू कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव यांनी शुक्रवारी दिली. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी आतापर्यंत सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक आहे. शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत एकूण ५,२०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सीईटी परीक्षा झाल्यानंतर सुरू होणार आहे. सध्या महाविद्यालयांनी तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

चौकट

पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू

कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी प्रथम वर्षाच्या प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सुरू झाली. विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, आदी प्रक्रिया महाविद्यालयांनी गुरुवारपर्यंत पूर्ण केली. न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, डीआरके कॉमर्स कॉलेज, महावीर महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. कोरोनाच्या नियमांचे पालन करत महाविद्यालयांमध्ये प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांनी केली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे सचिव व्ही. एम. पाटील यांनी दिली.

Web Title: Offline admission process for Agricultural Technology Diploma course started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.