‘महसूल’च्या आज आॅफलाईन बदल्या

By admin | Published: May 31, 2016 01:00 AM2016-05-31T01:00:46+5:302016-05-31T01:17:36+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : कर्मचाऱ्यांमध्ये घालमेल; गुणवत्ता, योग्यता तपासली जाणार

Offline Changes to 'Revenue' | ‘महसूल’च्या आज आॅफलाईन बदल्या

‘महसूल’च्या आज आॅफलाईन बदल्या

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल आस्थापनेतील बदल्या आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने आज, मंगळवारी होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी हे स्पष्ट केले. तहसीलदारांकडून त्यांच्याकडील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली असून, त्यानुसार प्रत्येकाची गुणवत्ता व योग्यता पाहूनच योग्य त्या ठिकाणी या बदल्या केल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग प्रशासनाच्या कामात कशा पद्धतीने होईल? यादृष्टीने या बदल्यांचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मे महिना म्हणजे महसूल आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम. या बदल्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीचा यावर्षी अवलंब न करता ‘आॅफलाईन’ पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सोमवारी बदल्या होणे अपेक्षित होते; परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे या बदल्या झाल्या नाहीत. त्या आता आज, मंगळवारी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बदल्यांमध्ये १६ नायब तहसीलदार, ६२ मंडल अधिकारी व अव्वल कारकून, तसेच ७६ लिपिकांचा समावेश आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षे काम केलेल्या नायब तहसीलदारांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गतच होणार आहेत. त्याचबरोबर महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी मुख्यालयात सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या तसेच सध्याच्या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या व बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागून घेण्यात आली आहे.
बदल्यांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची घालमेल वाढली आहे. सोमवारी बदल्या होणार होत्या; परंतु त्या न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचारी याबाबत गटा-गटाने चर्चा करताना दिसत होते. आॅनलाईन पद्धतीऐवजी आॅफलाईनद्वारे बदल्या होणार असल्याने कोण कुठे जाणार? हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घालमेलीत भर पडली आहे. (प्रतिनिधी)


महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज, मंगळवारी होणार आहेत. त्यानुसार सर्व तहसीलदारांकडून बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची योग्यता, गुणवत्ता, आदी माहितीही मागविली आहे. यंदा आॅनलाईनऐवजी आॅफलाईन पद्धतीनुसारच बदल्या होणार आहेत. ज्या ठिकाणी व्यक्तीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्या योग्यतेच्या व्यक्तीला पाठवून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेऊन प्रशासनाच्या कामात सुलभता आणणे, हा ‘आॅफलाईन’ मागील उद्देश आहे. -डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी.

Web Title: Offline Changes to 'Revenue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.