रिक्षांसह वाहनचालकांचा मंगळवारी बंद
By admin | Published: March 4, 2016 11:20 PM2016-03-04T23:20:03+5:302016-03-04T23:57:15+5:30
परमिट शुल्कवाढीचा प्रश्न : ‘आरटीओ’ कार्यालयाजवळ निदर्शने; सोमवारी मध्यरात्रीपासून सुरुवात
कोल्हापूर : नवीन परमिट व नूतनीकरणाचे वाढविलेले शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) रिक्षासह लक्झरी, स्कूल बस, ट्रक, टॅक्सीचालकांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रश्नी शुक्रवारी दुपारी ताराबाई पार्कमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) चालकांनी तीव्र निदर्शने केली. या मागणीसाठी रिक्षाचालकांनी राज्यात सर्व जिल्ह्यांतील आरटीओ कार्यालयांसमोर आंदोलन केले.
शासनाने १० फेबु्रवारी २०१६ रोजी माल व प्रवासी वाहनधारकांवर नवीन व नूतनीकरण परमिटचे शुल्क वाढविण्याची अधिसूचना काढली आहे. त्यास रिक्षाचालक, ट्रकचालक, लक्झरी, स्कूल बस, ट्रक यांचा विरोध आहे. देशात महाराष्ट्र हे महसुलाबाबत सधन राज्य म्हणून ओळखले जाते. वर्षाकाठी माल व प्रवासी वाहनधारक वाहनांच्या सर्व करांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा कर महसूल म्हणून शासनाच्या तिजोरीत जमा करतात. (उदा. वाहनांचा रस्ते कर, परमिट, पासिंग, रजिस्ट्रेशन फी, प्रदूषण कर, व्यवसाय कर, आदी) या करांच्या माध्यमातून वरील कर वाहनचालक भरतात. याशिवाय महाराष्ट्रात डिझेलवर सेस टॅक्स आकारला जातो. तोसुद्धा वाहनधारक भरतो. म्हणून पूर्वीप्रमाणेच रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, टँकर, बस या सर्व वाहनांना माल व प्रवासी, नवीन व नूतनीकरण परवाना शुल्क आकारावे. नूतनीकरण न केलेल्या परवानाधारकास पूर्वीप्रमाणे शंभर रुपयांचे दंडात्मक शुल्क आकारावे, अशी मागणी आहे. त्यामुळे शासनाने ही वाढीव, नवीन व नूतनीकरण परवाना शुल्क व परवाना नूतनीकरण न केलेल्या वाहनधारकांवरील दंडात्मक कारवाई रद्द न केल्यास महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन पुकारू, असा इशारा यावेळी दिला.
यावेळी सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, राजू जाधव, सुभाष शेटे, विलास माताडे, चंद्रकांत भोसले, आदींची भाषणे झाली. सोमवारी (दि. ७) रात्री १२ वाजल्यापासून सर्व रिक्षा, माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद राहतील आणि मंगळवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानकापासून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी सर्वांनुमते घेण्यात आला.
निदर्शनांत रिक्षाचालक सेना, बस ओनर्स असोसिएशन, करवीर आॅटो रिक्षा, खासगी बस वाहतूक, आदर्श टेम्पो युनियन, शाहूवाडी तालुका मोटार मालक, शिरोली एमआयडीसी ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, गांधीनगर ट्रान्स्पोर्ट, कोल्हापूर गुड्स ट्रान्स्पोर्ट, जिल्हा वाळू वाहतूक, मालट्रक वाहतूकदार, राधानगरी तालुका बॉक्साईट, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, इचलकरंजी स्कूल बस, कोल्हापूर स्कूल बस, शेअर-ए-रिक्षा, काँग्रेस आॅटो हिंदुस्थान रिक्षा, कॉमन मॅन, राष्ट्रवादी रिक्षा, जयहिंद मोटार मालक संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
स्कूल बसही बंद
सध्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी एक दिवस पालकांनी पाल्याला शाळेत सोडावे व रिक्षाचालक, स्कूल बस चालकांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.