अरे व्वा! चांगला माणूस कुलगुरू मिळाला

By Admin | Published: June 17, 2015 12:57 AM2015-06-17T00:57:20+5:302015-06-17T01:05:37+5:30

शिक्षणक्षेत्रातील प्रतिक्रिया : शिवाजी विद्यापीठाला संधी कधी मिळणार ?

Oh wow! Good man got the Vice-Chancellor | अरे व्वा! चांगला माणूस कुलगुरू मिळाला

अरे व्वा! चांगला माणूस कुलगुरू मिळाला

googlenewsNext

कोल्हापूर : औरंगाबादच्या प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांची कुलगुरू म्हणून निवड झाल्याचे समजताच ‘अरे व्वा, शिवाजी विद्यापीठाला चांगला कुलगुरू मिळाला..’ अशी प्रतिक्रिया शिक्षणक्षेत्रातून व्यक्त झाली. ‘रसायन क्षेत्रातील चार पेटंट नावावर असलेला तरुण संशोधक,’ अशी त्यांची ओळख आहे. शिंदे यांचे अभिनंदन करतानाच कोल्हापूरच्या विद्यापीठाला कोल्हापूरचा कुलगुरू कधी मिळणार, असेही शल्य अनेकांनी व्यक्त केले.
कुलगुरुपदासाठी पाच अंतिम नावे स्पर्धेत होती. हे पद शैक्षणिक असले तरी त्याची नियुक्ती होताना राजकारण व समाजकारणही विचारात घेतले जाते. पुण्यातील डॉ. नितीन करमळकर व डॉ. एस. पी. गोविंदवार यांची नावे अखेरच्या टप्प्यात चर्चेत आली होती. करमळकर यांच्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचाच आग्रह होता, तर गोविंदवार यांच्यासाठी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी ताकद लावली होती. त्यामुळे ही निवड लांबली, परंतु अखेर शिंदे यांना ही संधी मिळाली. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वजन त्यासाठी कामी आल्याचे समजते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही सगळ््यांनीच भेट घेऊन ‘शब्द’ टाकला होता; परंतु त्यांनी आपण या निवडीत ढवळाढवळ करणार नाही, अशी भूमिका घेतली. ही निवड करताना जातीय समतोलही सांभाळला जातो. कोल्हापूरचे समाजकारण, त्यात शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले विद्यापीठ त्यामुळे बहुजन समाजातील व्यक्तीला प्राधान्य दिले जावे, असाही विचार शिंदे यांची निवड करताना केला गेला.
डॉ. शिंदे यांची संशोधनात रमलेला व सकारात्मक विचारप्रवृत्ती असलेला प्राध्यापक, अशी प्रतिमा आहे. ते वयाने तरुण आहेत. यापूर्वी डॉ. के. बी. पवार (वय ४७) आणि डॉ. माणिकराव साळुंखे (४९) हे तरुण कुलगुरू शिवाजी विद्यापीठाला लाभले होते. विज्ञान शाखेतील प्राध्यापक म्हटले की तो संशोधनात रमतो व समाजापासून तुटलेला असतो, अशी लोकभावना असते. विद्यापीठाने माळावर न राहता समाजात यावे, अशी कोल्हापूरची मागणी असते. नव्या कुलगुरूंपुढे समाजाचे शैक्षणिक व ज्ञानाचे नेतृत्व करण्याचे आव्हान असेल.
शिंदे यांच्या निवडीने या विद्यापीठाचे नेतृत्व मराठवाड्यातील व्यक्तीकडे गेले आहे. यावेळी कोल्हापूरच्या विद्यापीठातील डॉ. गोविंदवार, डॉ. एम. बी. देशमुख आणि डॉ. सी. डी. लोखंडे यांनी प्रयत्न केले. त्यात गोविंदवार हे अंतिम पाच उमेदवारांमध्ये होते, परंतु त्यांना ही संधी मिळाली नाही. आतापर्यंत डॉ. आप्पासाहेब पवार, प्रिं. बी. एस. भणगे, डॉ. रा. कृ. कणबरकर हे कोल्हापूरचे, बॅरिस्टर पी. जी. पाटील साताऱ्याचे, प्रिं. के. भोगिशयन सोलापूरचे, तर माणिकराव साळुंखे व एन. जे. पवार हे मूळचे सांगलीचे होते. के. बी. पवार, द. ना. धनागरे, डॉ. एम. जी. ताकवले आणि एन. जे. पवार हे पुणे विद्यापीठातून आले होते.

डॉ. शिंदे यांचा अल्पपरिचय
नाव : प्रा. डॉ. देवानंद बाबूराव शिंदे
मूळ गाव : शिंगोली (जि. उस्मानाबाद)
जन्मतारीख : ६ फेब्रुवारी १९६३
पद : रासायनिक तंत्रज्ञान (केमिकल टेक्नॉलॉजी) विभागाचे प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
विद्यापीठातील अधिकार मंडळांतील कामकाज : परीक्षा मंडळ, बीसीयुडी, विद्यापीठ शिक्षण व संशोधन मंडळ, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य
अध्यापन कारकीर्द : अध्यापन क्षेत्रातील २४ वर्षांचा अनुभव, केमिकल टेक्नॉलॉजी व केमिकल इंजिनिअरिंग आणि नॅनोटेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड फार्मसीच्या अभ्यासक्रम निश्चित समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलेले
आहे.
संशोधन कारकीर्द : संशोधन क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव, युएसए, स्वीत्झर्लंड आणि केंद्र सरकारची त्यांना फेलोशिप
मिळाली आहे. औषध निर्माण शास्त्रातील संशोधनाचे दोन पेटंटची त्यांच्या नावावर नोंद आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या दोनशे संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते ११० परिषदांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळविली आहे. देशातील ३२ विद्यापीठांमधील शोधनिबंधांचे बाह्ण तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले आहे.
पुरस्कार व अन्य क्षेत्रांतील योगदान : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी इंटरनॅशनलने २००८ मध्ये त्यांना ‘गुरूगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. औरंगाबादमधील फूड पार्कच्या स्थापनेसाठी औद्योगिक विकास महामंडळाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.


चौथ्यावेळी मिळाली संधी
डॉ. शिंदे हे २०१० मध्ये नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाच्या तर २०१३ मध्ये कुलगुरूपदासाठीच्या अंतिम मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र १५ जणांमध्ये त्यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यांना यशाने हुलकावणी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या माध्यमातून त्यांना चौथ्यावेळी यश मिळाले आहे. उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याची त्याची मागणी होती. उस्मानाबाद विद्यापीठ कसे असावे याचा आराखडा त्यांनी बनविला होता.
चर्चेला पूर्णविराम
विद्यापीठासाठी कुलपती सी. विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश के. एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती. यात उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके हे सदस्य होते. या समितीने अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली. त्यांच्या अंतिम मुलाखती ६ जून रोजी कुलपतींनी घेतल्या. यात डॉ. शिंदे यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील डॉ. एस. पी. गोविंदवार, सोलापूरचे डॉ. एल. पी. देशमुख, पुण्यातील डॉ. नितीन करमळकर आणि नांदेडमधील डॉ. नामदेव कल्याणकर यांचा समावेश होता. निवडीच्या घोषणेला विलंब लागल्याने विद्यापीठात चर्चा सुरू होती. डॉ. शिंदेंच्या निवडीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Web Title: Oh wow! Good man got the Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.