‘त्या’ वृध्देला अखेर घर मिळाले
By admin | Published: November 19, 2014 10:36 PM2014-11-19T22:36:30+5:302014-11-19T23:22:47+5:30
रिक्षाचालकांचा आधार : मुलाने घरी नेले==लोकमत प्रभाव
सांगली : येथील राममंदिर कॉर्नरवरील रिक्षा थांब्यावर गेल्या सात दिवसांपासून बेवारस स्थितीत राहिलेल्या वृद्ध महिलेला अखेर घर मिळाले. ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त वाचून तिच्या मुलाने आज (बुधवार) सकाळी तिला घरी बोलावून नेले.
सात दिवसांपूर्वी या वृद्धेला तिचा मुलगा एका रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन आला होता. मुलाने तिला राममंदिर कॉर्नरवर सोडले आणि त्याने ‘आई तू इथंच थांब, मी लगेच आलो’, असे सांगून तो निघून गेला, असे ही वृद्धा सांगत होती. एक-दोन दिवस होऊन गेले तरी कोणीच न आल्याने रिक्षावाल्यांनी वृद्धेला आधार दिला. तिच्या चहा-पाणी व जेवणाचीही सोय केली. थंडीचे दिवस असल्याने तिला पांघरण्यासाठी नवीन चादर खरेदी करून दिली होती. तुळशीराम खरात या चहावाल्याने तिला रोजचा चहा, नाष्टा दिला, तर राम मंदिर रिक्षा स्टॉपच्या सर्व चालकांनी तिच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. याचे वृत्त आज ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास या वृध्देचा अंदाजे ५० वर्षाच्या मुलाने रिक्षा स्टॉप गाठला. आई हरवली होती, आम्ही तिचा सर्वत्र शोध घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. आज ‘लोकमत’मधील बातमी वाचून तिला नेण्यासाठी आलो असल्याचे त्याने रिक्षाचालकांना सांगितले. सुरुवातीला वृध्देने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला; मात्र मुलाने रडून तिची माफी मागितल्यानंतर वृध्दा त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. अखेर रिक्षाचालकांचे आभार मानून त्याने तिला घरी नेले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास या वृध्देचा अंदाजे ५० वर्षाच्या मुलाने रिक्षा स्टॉप गाठला. आई हरवली होती, ‘लोकमत’मधील बातमी वाचून तिला नेण्यासाठी आलो असल्याचे त्याने रिक्षाचालकांना सांगितले.