वृद्धाश्रम, निवारा केंद्रांत बाहेरील व्यक्तींना ‘प्रवेशबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:43+5:302021-05-10T04:24:43+5:30
कोल्हापूर : शहरातील विविध वृद्धाश्रम, केअर सेंटर आणि निवारा केंद्रांतील ज्येष्ठ नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थाचालकांकडून काळजी आणि आवश्यक ...
कोल्हापूर : शहरातील विविध वृद्धाश्रम, केअर सेंटर आणि निवारा केंद्रांतील ज्येष्ठ नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थाचालकांकडून काळजी आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या नियमांच्या पालनासह नातेवाईक, देणगीदार, आदी बाहेरील व्यक्तींना या नागरिकांशी भेटणे बंद करण्यात आले आहे. त्यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधण्याची व्यवस्था केली आहे.
चंबूखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात ४६ ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचा लसीकरणाचा पहिला डोस झाला असून, दुसरा डोस देण्याची तयारी सुरू आहे. धान्याची पुरेशी मदत झाली आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला वृद्धाश्रम परिसरात प्रवेश दिला जात नाही. कोरोना नियमांचे पालन केले जात असल्याचे या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी सांगितले. सावली केअर सेंटरमध्ये ६० ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. त्यांचा ज्येष्ठ नागरिकांशी मोबाइल, ऑनलाइन संपर्क, बोलणे करून दिले जात असल्याचे ‘सावली’चे प्रकल्प संचालक किशोर देशपांडे यांनी सांगितले. आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमात ७० ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना जेवण, चहा, नाश्ता, औषधे त्यांना जागेवर दिली जात आहेत. त्यांना इतरांना भेटू दिले जात नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या नागरिकांचे लसीकरण केले जाईल. दानशूर व्यक्ती, संस्थांनी धान्य, अन्य स्वरूपात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन या वृद्धाश्रमाचे सचिव शरद पाटोळे यांनी केले आहे. बालकल्याण संकुलात २२५ मुले-मुली आहेत. संकुलात सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅॅनिटायझरचा वापर या कोरोना नियमांचे पालन केले जात आहे. देणगीदारांना मुलांना भेटू दिले जात नाही. संकुलात १८ वर्षांवरील दहा मुली आहेत. त्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर करून घेतले जाणार असल्याचे संकुलाच्या सचिव पद्मजा तिवले यांनी सांगितले.
चौकट
आधारकार्ड नसलेल्या ज्येष्ठांची अडचण
अवनी संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शहरातील विविध पाच निवारा केंद्रांत एकूण ८४ ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना चहा, नाश्ता, जेवण, औषधे देण्यात येत आहेत. कोरोनामुळे त्यांना आणि बालगृहातील ३५ मुलांना इतर कोणालाही भेटू दिले जात नसल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले. फुटपाथ, विविध पडक्या इमारतींमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ आणि इतर नागरिकांसाठी कसबा बावडा परिसरात निवारा केंद्र सुरू केले आहे. अशा लोकांची स्वॅॅब तपासणी केली जाते. त्यात पॉझिटिव्ह आल्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात, तर निगेटिव्ह आल्यास निवारा केंद्रात त्यांना प्रवेशित केले जात आहे. असे १७ लोक सध्या आहेत. या आणि निवारा केंद्रांतील अनेकांची आधारकार्ड नाही. त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे अडचणीचे ठरत आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांसमवेत चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याची मागणी करणार असल्याचे अध्यक्षा भोसले यांनी सांगितले.