बंदोबस्तावरील जवानांचा रंगला कौतुक सोहळा जुना बुधवार पेठेने व्यक्त केली कृतज्ञता : पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी भगवा फेटा प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:45 AM2018-01-20T00:45:23+5:302018-01-20T00:45:50+5:30
कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.
कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला.
पंधरा दिवस ज्या जवानांनी डोळ्यात तेल घालून याठिकाणी बंदोबस्त केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय परिसरातील माजी नगरसेवक धनंजय सावंत, तालमीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, रणजित पाटील, संजय पाटील, सुनील शिंदे, रमेश गवळी सुशील भांदिगरे आदींनी घेतला. त्यानुसार तालमीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व जवानांना रात्री कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद देऊन पाहुणचार केला.यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रशांत अमृतकर म्हणाले,आम्ही पोलिस रात्री घरी जाऊ शकतो. कुटुंबात थोडा वेळ देऊ शकतो. पण हजारो किलो मीटर अंतरावरुन येऊन राज्य पोलिस दलाचे कर्मचारी बंदोबस्त करतात.त्यांचा कामाची दखल जुना बुधवार तालीमने घेतली. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
दरम्यान,तालमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्य राखीव जवानांनी अनेक तणावाच्या ठिकाणी आम्ही काम केले.यावेळी काम करताना आमच्यावर ताण येत होता. मात्र, तालमीच्या परिसरात पहिल्या दिवसापासून नागरिकांनी सहकार्य केले, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासो मोरे, प्रताप उर्फ बापू घोरपडे, दिलीप गवळी, दिलीप दिंडे, रमेश पुरेकर,आनंदा वरेकर, सुशांत महाडिक, किसन पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरेगांव-भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन जानेवारीला कोल्हापूर बंद होते. दिवसभर झालेल्या तणावामुळे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी बोलविण्यात आली होती. त्यानंतर जुना बुधवार तालीमकडून सिद्धार्थनगरकडे जाणाºया रस्त्यावर जवानांचा बंदोबस्त होता. पण जुना बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगरातील भावनिक नात्यामुळे तीन तारखेच्या घटनेनंतर कोणताही वाद झाला नाही. तरीही जुना बुधवार पेठ व सिद्धार्थनगरातील लोकांना राज्य राखीव पोलिस दलाचा आधार होता. हळूहळू परिसरातील लोकांचा या जवानांबरोबर परिचय होऊ लागला. नागरिक त्यांना चहा पाणी, नाष्टा देऊ लागले व वातारवरण निवळू लागले.
संक्रातीच्या सणाला महिलांनी भोगीला बाजरीची भाकरी, संक्रांतीला पोळ्याचे जेवण दिले. तिळगुळ देऊन काहींनी आभार मानले. नागरिकांच्या आपुलकीमुळे पोलिस भारावले.
कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाने बंदोबस्तासाठी सिद्धार्थनगर येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा सत्कार बुधवारी पुष्पगुच्छ देऊन भगवा फेटा बांधून करण्यात आला. याप्रसंगी शहर पोलीस उपअधीक्षक
डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जवान उपस्थित होते.