Kolhapur: पंचगंगा स्मशानभूमीतील जुनी गॅस दाहिनी भंगारात जाणार, कोटीच्या नव्या दाहिनीचा घाट
By भारत चव्हाण | Published: May 23, 2024 12:04 PM2024-05-23T12:04:03+5:302024-05-23T12:04:41+5:30
वापर होत नसेल तर खर्च कशाला?
भारत चव्हाण
काेल्हापूर : एखादी वस्तू फुकट मिळाली की त्याची किंमत नसते. मग ती वस्तू कितीही लोकोपयोगी असो. त्याची नीट देखभाल केली जात नाही. असाच काहीसा अनुभव महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या बाबतीत आला आहे. ही दाहिनी ‘दान’ म्हणून फुकटात मिळाली, त्यामुळे त्याची अधिकाऱ्यांना किंमत कळली नाही, परंतु याच दाहिनीने कोरोना काळात अतिशय उत्तम काम केले. आज ही दाहिनी भंगारात काढली आहे. दाहिनीचे महत्त्वच कोणाला कळले नसल्याने आता ती किलोवर विकली जाईल.
मूळचे कोल्हापूरचे, परंतु व्यवसायाच्या निमित्ताने गुजरातमधील बडोदा शहरात स्थायिक झालेले राजेंद्र चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी महानगरपालिकेला दान म्हणून मोफत दिली. बडोद्याहून आणण्याचा वाहतूक खर्च, पंचगंगा स्मशानभूमीत ती बसविण्याचा खर्च हा सगळा राजेंद्र चव्हाण यांनी केला. तेथे करावी लागणारी अन्य कामेही महापालिकेने केली नाहीत. शेवटी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी पदरमोड करून हा दीड लाखाचा खर्च केला. तेव्हा कुठे ही गॅस दाहिनी येथे बसली.
एक कोटी रुपये खर्चून विकत घ्यायला आणि त्यातून ‘वरकमाई’ काढायला निघालेल्या काही नगरसेवक, अधिकाऱ्यांच्याही मोफत दाहिनी पचनी पडली नाही. परंतु माजी महापौर हसीना फरास यांच्या आग्रहामुळे ही गॅस दाहिनी बसली. नागरिकांचा विरोध असल्याचे कारण देत या दाहिनीत मृतदेह दहन करण्याचे टाळले गेले. तत्कालीन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ही दाहिनी कोरोना काळात सुरू केली. रोज आठ ते दहा याप्रमाणे दोन महिने मृतदेह या दाहिनीत दहन केले. फुकटात मिळालेल्या या गॅस दाहिनीचे महत्त्व त्यावेळी सर्वांना कळून चुकले.
परंतु, या गॅस दाहिनीचेच आता प्रशासनाने अंत्यसंस्कार केले आहेत. ती उखडून रस्त्याच्या कडेला आणून ठेवली आहे. काही किरकोळ दुरुस्त्या करून ती पुढील काळासाठी सज्ज ठेवली पाहिजे होती. परंतु तसे न करता ती खराब झालीय आता नवीन घ्यायला पाहिजे म्हणून जुनी गॅस दाहिनी भंगारात फेकून दिली आहे. पुढील काही दिवसांत ती किलोवर विकली जाईल. त्यामुळे दान स्वरुपात मिळालेल्या गॅस दाहिनीचा एक अध्याय संपणार आहे.
महापालिकेने स्पष्टीकरण द्यावे..
जुनी गॅस दाहिनी काढून तेथे नवीन गॅस दाहिनी बसविली जाणार आहे. त्याचे कारण महापालिका प्रशासनाने दिले नाही. एकीकडे विरोध आहे, त्यावर मृतदेह दहन करण्यास नागरिक नकार देत आहेत असे सांगायचे आणि दुसरीकडे तशीच नवीन दाहिनी विकत घेऊन त्यावर एक कोटी खर्च करायचे हा काय प्रकार आहे ? याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.
कुणाचा इंटरेस्ट..
केंद्र सरकारकडून पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याकरिता निधी मिळाला आहे. त्यातून एक कोटी रुपये खर्च करून ही नवीन गॅस दाहिनी घेतली जात आहे. जर पहिल्या गॅस दाहिनीला विरोध होता, वापर होत नव्हता, तर मग पुन्हा एकदा त्यावर खर्च कशासाठी, कोणाच्या ‘इंटरेस्ट’साठी केला जातोय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.