कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या भादवणच्या वृध्दाचा मुंबईत कोरोनानेच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 10:31 AM2020-06-04T10:31:23+5:302020-06-04T10:51:10+5:30
मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
सदाशिव मोरे
आजरा : मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आजऱ्यात आज ७ जण कोरोनाचे पाॅझीटीव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यात एकूण ५९ पाॅझीटीव्ह रुग्ण आहेत. या सातजणांपैकी
मेढेवाडी येथील २, बहिरेवाडीतील १, सरोळीतील ३ आणि लाकूडवाडी येथील एकाचा समावेश आहे.
लहानपणीच मुंबईत सदरचे गृहस्थ नोकरीसाठी गेले. वडील मुंबईतच असलेने तिथेच शिक्षण घेवून महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये नोकरीला लागले. सांताक्रूझ येथे स्थिरस्थावरही झाले. लग्न झाले, दोन मुली झाल्या. त्यांना शिक्षण देत स्वत: नोकरी सुरुच ठेवली.
भादवण या मूळ गावी वर्षा- दोन वर्षांतून नातेवाईकांचे लग्न समारंभ, वास्तुशांती यासह अन्य कार्यक्रमासाठी हे कुटूंब गावी यायचे. गरीबीतून शिक्षण घेवून नोकरी मिळविली. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केले.
कोरोनाच्या साथीत महानगरपालिकेच्या दवाखान्यात प्रामाणिकपणे काम करुन घरी स्वतंत्र खोलीतच राहत होते. पाच दिवसांपूर्वी ताप आला म्हणून दवाखान्यात दाखविले. दोन दिवसानंतर कोरोनासाठी स्वॅब घेतला. त्यामध्ये ते पॉझीटीव्ह आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. ज्या दवाखान्यात कोरोना रुग्णांची सेवा केली त्याठिकाणीच प्राण सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली.
कोरोना रुग्णांची सेवा करतानाच भादवणच्या वृध्द व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली. मुंबईत प्रशासनाने फक्त एकाच व्यक्तीला अंतिम दर्शन घेण्याची परवानगी दिली.पण हे अंत्यदर्शनही पत्नी व मुलींना मिळाले नाही. भादवणसह परिसरातून सदरच्या वृध्दाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.