वृद्धेचे तोंड दाबून गळ्यातील सोन्याचे चिताक लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:00+5:302021-08-19T04:29:00+5:30
कोल्हापूर : जनावरांच्या गोठ्यात धार काढण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे चिताक ...
कोल्हापूर : जनावरांच्या गोठ्यात धार काढण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे चिताक चोरट्याने हिसडा मारुन लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील बाचणी येथे घडली. याबाबत भागिरथी दत्तात्रय पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात ‘चेन स्नॅचिंग’ची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाचणी येथे भागीरथी पाटील या कुटुंबीयांसह राहतात. रोज सकाळी सात वाजता राहत्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील शेतातील गोठ्यात जनावरांना वैरण घालण्यासाठी आणि धार काढण्यासाठी त्या जातात. बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या. त्यावेळी शेतातील गोठ्याचा दरवाजा उघडत असताना अचानक पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांचे तोंड दाबून धरले. चोरट्याने हिसडा मारुन त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे चिताक काढून घेतले, त्यानंतर चोरटा हा सडोली खालसा गावाच्या दिशेने पळून गेला. त्याच्या पाठीमागे भागीरथी पाटील या आरडाओरडा करत पळाल्याने गोठ्यासमोर राहणाऱ्या इतर लोकांनीही चोरट्याचा पाठलाग केला. पण तो सापडला नाही. सुमारे २ लाख रुपये किमतीच सोन्याचे चिताक चोरल्या प्रकरणी भागीरथी पाटील यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली आहे.
रेनकोटमध्ये चोरटा
‘चेन स्नॅचिंग’ प्रकरणातील चोरट्याच्या अंगात रेनकोट होता व तोंडाला मास्क लावला होता अशी माहिती भागीरथी पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली.