दोन महिने भटकणाऱ्या वृद्धेला मिळाली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:52+5:302021-01-02T04:19:52+5:30
तुपारी हे सासर असलेल्या आणि सांगली जिल्ह्यातील चिकोर्डे हे माहेर असलेल्या आक्काताई निवास गुजले या वृद्धा या दोन ...
तुपारी हे सासर असलेल्या आणि सांगली जिल्ह्यातील चिकोर्डे हे माहेर असलेल्या आक्काताई निवास गुजले या वृद्धा या दोन महिन्यांपूर्वी घरातून फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. रस्ता चुकल्याने त्या तब्बल दोन महिने भटकत होत्या. तिकडे घरची मंडळी मात्र काळजीत होती त्यांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मोठी शोधशोध केली. त्यांनी या शहरात या वृद्धेची पोस्टरही चिकटवली होती. गेल्या दोन महिन्यांपासून शोधमोहीम चालू होती.
तीस डिसेंबरला रात्री आठ वाजता तुकाराम चौकातील हनुमान मंदिर परिसरात नेहमीप्रमाणे सात-आठ तरुण बसले होते. त्यांना त्या मंदिराच्या कट्ट्यावर बसलेली ती वृद्धा दिसली. त्यांनी तिच्या जवळ जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपला पत्ता सांगितला. तरुणांनी त्या वृद्धेच्या गावातील फोन उपलब्ध केला. त्यांच्या व्हॉट्सअप वरती फोटो पाठवला आणि ओळख पटली. तत्काळ त्यांच्या घरच्या लोकांनी या तरुणांना फोन केला आम्ही निघालो आहे तोपर्यंत तिला सांभाळा.
रात्री आठला बाहेर पडलेले तिची मुलगी जावई व अन्य नातेवाईक ३१ डिसेंबरला पहाटे तीन वाजता मुरगूडमध्ये पोहोचली. तोपर्यंत हे सर्व तरुण जागे होते. दोन महिन्यांची आतरूता नाहीशी झाली. पहाटे तुकाराम चौकात आनंदाचे हुंदके बाहेर पडले आणि कुटुंबांनी या तरुणांचे आभार मानत परतीचा प्रवास सुरू केला. या मायलेकीची भेट घडवून देण्यामध्ये तौफिकखान जमादार,अल्ताफभाई जमादार,अमोल मंडलिक,तुषार साळोखे,मोहसीन चाऊस,तौफिक अत्तार,सिताराम कांबळे,जावेद शिकलगार,रईस आत्तार,पृथ्वीराज चव्हाण या तरुणांनी मोठी कामगिरी बजावली.
फोटो ओळ :-तुपारी येथील दोन महिने घराबाहेर असणाऱ्या आईची भेट घडवून देणाऱ्या मुरगूड (ता. कागल) मधील तरुणांच्यासोबत त्या वृद्धेचे नातेवाईक
३१ मुरगूड वूमन