म्हातारा धो-धो बरसला तरच ‘चिकोत्रा’ भरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:15 AM2018-07-23T00:15:44+5:302018-07-23T00:15:49+5:30
रवींद्र येसादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर : सगळीकडे दमदार पाऊस पडल्यामुळे धरणे भरत आहेत. मात्र, आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्प त्यास अपवाद ठरला. म्हातारा पाऊस धो-धो बरसला तरच चिकोत्रा प्रकल्प भरणार आहे. म्हातारीच्या पठारावरील पाण्याचा ओघ सुरू झाल्याने प्रकल्प ४० टक्केच भरला आहे.
बहुचर्चित भुदरगड तालुक्यातील म्हातारीचे पठार येथे वनखात्याच्यावतीने बांधण्यात आलेला बंधारा सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला असून, पाणी बांधावरून वाहत आहे. चिकोत्रा प्रकल्प ४० टक्के, तर मेघोली प्रकल्प ७५ टक्के इतका भरला आहे.
आजरा, भुदरगड, कागल तालुक्यांतील ५२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्यावर्षी धरण केवळ ६३ टक्के इतकेच भरले होते. चिकोत्रा धरणात पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने चार वर्षांपूर्वी म्हातारीचे पठार येथील वनविभागाच्या हद्दीत साधारणत: २०० मीटर लांबीचा बांध घालण्यात आला.
त्यामुळे येथून वाहून जाणारे पाणी अडविण्यात येऊन बंधाऱ्यातील पाणी २०० मीटर लांबीची चर काढून चिकोत्रा नदीपात्राच्या दिशेने सोडण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात चिकोत्रा धरण भरण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग होऊ लागला; पण हे पाणी अडविल्यामुळे मेघोली प्रकल्प भरणार नाही या गैरसमजुतीतून मेघोलीच्या अज्ञात ग्रामस्थांनी हा बांध फोडला. यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी अन्यत्र वाहून गेले.
प्रांताधिकारी व वनविभागाचे अधिकारी व दोन्हीकडील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत फोडलेल्या बंधाºयाचा बांध नव्याने घालून पावसाळ्यात बंधारा भरल्यानंतर पाणीपातळी ९८ तलांकावर आल्यानंतर पाणी चिकोत्रा व मेघोली असे दोन्हीकडे सोडण्याचे ठरविण्यात आले.
गतवर्षी तेथून चिकोत्राकडे येणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.
यावर्षी हा बंधारा संततधार पडणाºया पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. पिंपळगाव वनविभागाचे वनपाल के. एच. पाटील, वनरक्षक ए. एम. चौगले यांनी पठारावर भेट देऊन पाणीसाठा व दोन्हीकडे जाणाºया पाण्याची पाहणी केली. चिकोत्राकडे जाणाºया चर मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसून पाणी प्रमाण वाढत आहे. तसेच मेघोलीच्या दिशेनेही पाणी जात आहे. सध्या पठारावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बंधाºयातील पाणी पातळी दररोज वाढत आहे.
मेघोलीमध्ये ७० टक्के पाणीसाठा
साधारणत: ९८.२३ द. ल. घ. मी. इतकी क्षमता असलेला मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प ७० टक्के भरला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये हा प्रकल्प ६० टक्के भरला होता. म्हातारीच्या पठारावर पाऊस जोरदार पडत असल्याने जुलै महिनाअखेर प्रकल्प पूर्ण भरेल.
चिकोत्रात ४० टक्के पाणीसाठा : पावसामुळे दीड टीएमसी इतकी क्षमता असलेल्या चिकोत्रा धरणातील पाणी वाढण्यास मदत झाली आहे. सध्या धरणात ६३०
द. ल. घ. मी. इतका पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच धरण ४० टक्के इतके भरले आहे.