‘आरटीओ’ही स्वीकारणार जुन्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 12:58 AM2016-11-19T00:58:40+5:302016-11-19T01:08:42+5:30
२४ पर्यंत मुदत : थकीत करांसह सर्व कर स्वीकारणार - पवार
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही वीज वितरण, बीएसएनएल, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे थकीत कर, व्यवसाय कर, सर्व दंड, नोंदणी शुल्क आदी स्वीकारण्याचे आज, शनिवारपासून धोरण स्वीकारले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी दिली.
यामध्ये नूतन खरेदी वाहन नोंदणी कर, पर्यावरण कर, आंतरराज्य परवाना शुल्क, थकीत कर, चालू व्यवसाय कर, फॅन्सी नंबर, व्हीआयपी नंबर शुल्क, जुने थकीत कर आदींचा समावेश आहे. या कर व शुल्कापोटी १००० व ५०० च्या जुन्या नोटा कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. शनिवारी (दि. १९) ते गुरुवारी (दि. २४) तारखेपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या महसुलासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही जादाचा कर्मचारी वर्ग या कामी नेमला आहे. प्रतिदिन सुमारे २० लाखांपर्यंतचा महसूल हे कार्यालय गोळा करत होते.
मात्र, ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यापासून या कार्यालयात प्रतिदिन २० हजार इतकाच महसूल गोळा होऊ लागला होता. त्यात आता नव्या केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांनी १४ नोव्हेंबरला एका आदेशाद्वारे जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश या कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार शनिवार(दि. १९)पासून स्वीकारली जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले.
राज्य शासनाच्या अन्य खात्यांनी करापोटी जुन्या ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या होत्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही या नोटा स्वीकारणे अपेक्षित होते. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांनी दि. १७ ला आदेश दिल्यानंतर तत्काळ नोटा स्वीकारण्यास सुरुवात करणे अपेक्षित होते तरी ही कसर सुटीतही ‘विशेष कक्ष’ स्थापून भरून काढावी.
- सुभाष जाधव
अध्यक्ष, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन