जुनी पेन्शन योजना: कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हजार कर्मचारी संपात सहभागी, कार्यालयात शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:44 AM2023-03-14T11:44:32+5:302023-03-14T11:45:01+5:30
काल, सोमवारी दुपारनंतरच अनेक सरकारी कार्यालयात शुकशुकाट
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आज मंगळवारपासून सरकारी निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. जिल्ह्यातील ८० हजारांवर कर्मचारी व शिक्षक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे काल, सोमवारी दुपारनंतरच अनेक सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता.
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत संघटनेची बैठक झाली. त्यात तोडगा न निघाल्याने सायंकाळी संघटनांनी संप सुरू करत असल्याचे जाहीर केले.
आज मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत टाऊन हॉलमध्ये संघटनेच्या प्रमुखांची भाषणे होतील. त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल असा रॅलीचा मार्ग असेल. शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत संप सुरू राहील, असे संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले.
संपाच्या आधीच सोमवारी दुपारनंतर सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संघटनेचे पदाधिकारी संपाबाबतच्या बैठकीला गेले होते. तर संपाच्या वातावरणामुळे अन्य कर्मचारीही गायब झाल्याचे चित्र होते.
जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी
एकीकडे संपाबाबत मुख्य सचिवांची व्हीसी सुरू होती. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व अन्य विभागप्रमुख सहभागी झाले असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
साडेतीन लाख विद्यार्थ्यांना फटका
या संपात जिल्ह्यातील सरकारी शाळा, अनुदानित शाळा, जिल्हा परिषद महापालिका शाळा तसेच ज्युनिअर कॉलेज, डी.एड. कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, शिक्षण उपसंचालक कार्यालय यांसह शैक्षणिक कार्यालयातील कर्मचारी सहभागी होत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे.
१० वी १२ वीला अडचण नाही...
सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. पेपर असेल त्या दिवशी शिक्षक व कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असतील. परीक्षा सुरळीत पार पडेल. पण ड्युटीवर असलेले कर्मचारी मस्टरवर सही करणार नाहीत किंवा आपली हजेरी नोंदवणार नाहीत.