जानकी वृध्दाश्रमातील वृध्दांना मिळाले ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:16+5:302021-01-15T04:21:16+5:30
कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील तीस वृद्धांना निवडणूक ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे आश्रमातील वृद्धांना मतदानाचा ...
कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील तीस वृद्धांना निवडणूक ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे आश्रमातील वृद्धांना मतदानाचा आनंद घेता येणार आहे.
येथील जानकी वृद्धाश्रमात ४२ वृद्ध महिला व पुरुष आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करून, गरिबीचे चटके सोसले असताना, वृद्धापकाळात मुलांनी घराबाहेर हाकलून दिलेले तसेच स्टॅन्ड व फूटपाथवर झोपणाऱ्या वृद्धांना आश्रमात मायेचा आधार मिळत आहे. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध भागातील वृद्ध असल्याने त्यांना मतदान ओळखपत्र मिळत नव्हते. आश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी आश्रमातील वृद्धांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लागणारी कागदपत्रे निवडणूक विभागाला उपलब्ध करून दिल्याने त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून ओळखपत्रे दिली आहेत.
गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. वृद्धाश्रमात मतदारांचा एकगठ्ठा मतदान असल्याने उमेदवार मतासाठी आश्रमाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्यानिमित्ताने उमेदवार वृद्धाचे पाय धरत असल्याने वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.