गांधीनगरच्या जुन्या पोलीस चौकीचे अद्यावतीकरण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:28+5:302021-04-18T04:22:28+5:30
गांधीनगर : गांधीनगर येथील जुन्या पोलीस चौकीची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून तिची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. ...
गांधीनगर : गांधीनगर येथील जुन्या पोलीस चौकीची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून तिची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. १९८० मध्ये गांधीनगरचा नगरविकास आराखडा करण्यात आला. त्यावेळी जुन्या पोलीस चौकीची स्थापना झाली. अवघ्या दोन पोलिसांच्या खांद्यावर गांधीनगरची धुरा होती. वाढत्या व्यापारीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसंख्येच्या आधारावर १९९३ ला नवीन पोलीस ठाण्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जुनी पोलीस चौकी काहीशी अडगळीत गेली. या चौकीच्या भिंती पडण्याच्या स्थितीत असून त्यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या जुन्या चौकीत कचऱ्याचे साम्राज्य तसेच उंदीर, घुशी, साप मुक्तपणे वावरत असतात. काहीनी या पोलीस चौकीला कचराकुंडी केले आहे. विविध ठिकाणचा पडणारा कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. गांधीनगर जुन्या पोलीस चौकीची जागा मध्यवर्ती असल्याने काही लँडमाफियांचा या जागेवर डोळा आहे. त्यामुळे ही जागा लँडमाफियांच्या घशात जाण्याआधीच संबंधित प्रशासनाने ती जागा सुव्यवस्थित करून त्या ठिकाणी पोलिसांसाठी अद्यायवत इमारत उभी करण्याची आवश्यकता आहे.
कोट : सध्याच्या पोलीस ठाण्यांमध्ये जागेअभावी भरपूर अडचणी निर्माण होत आहेत. जुन्या पोलीस चौकीची जागा अद्ययावत करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.
- धीरज टेहलानी, माजी ग्रामपंचायत सदस्य
फोटो : १७ गांधीनगर पोलीस चौकी
ओळ- कोल्हापूर येथील गांधीनगरच्या जुन्या पोलीस चौकीची झालेली दुरवस्था.