कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या योजना सुरूच राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:54 PM2018-08-17T13:54:04+5:302018-08-17T13:56:17+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केले.
त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांनी त्यांचे स्वागत केले. यांनतर दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मित्तल म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात आदिवासी विभागासह वेगवेगळे चार कार्यभार माझ्याकडे होते. शिक्षण, आरोग्य, ग्र्रामीण विकास यंत्रणा, पाणीपुरवठा या विभागांकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध योजनांबाबत पत्रकारांकडून माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, नवीन योजना सुरू करून त्याच्या कार्यवाहीमध्ये वेळ घालविण्यापेक्षा आहेत त्या चांगल्या योजना त्याच पद्धतीने पुढे चालविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी सर्व विभागप्रमुखांची प्राथमिक बैठक घेतली. यानंतर दुपारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही मित्तल यांनी चर्चा केली.
दिवसभर विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मित्तल यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्याशी त्यांनी पंचगंगा प्रदूषण व प्रधानमंत्री घरकुल योजनेबाबत चर्चा केली.
माझी मराठी भाषा चांगली होईल
मूळचे दिल्लीचे असलेले मित्तल यांचे इंग्रजी, हिंदीवर प्रभुत्व आहे. मात्र, चंद्रपूर आणि नाशिक येथे काम केल्याने ते चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. कोल्हापुरात आल्यामुळे माझी मराठी आणखी चांगली होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.