महापूर नियंत्रणासाठी जुनी आरटीडीए सिस्टीम वापरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:49 PM2020-07-03T15:49:47+5:302020-07-03T15:55:01+5:30
पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम अस्तित्वात असतानाही तिचा म्हणावा तसा वापर होऊ शकला नाही. गेल्या वर्षी आलेल्या प्रलंयकारी महापुरानंतर तिची उपयुक्तता पुन्हा एकदा जाणवू लागल्याने पाटबंधारे विभागाने ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी पुराचा अंदाज बांधणे सोपे होणार आहे.
कृष्णा व भीमा खोऱ्यांतील पडणारा पाऊस, धरणांतील पाण्याची पातळी, होणारा पाण्याचा विसर्ग यांतून निर्माण होणारी पूरस्थिती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २०१४ साली जलसंपदा विभागाने आरटीडीए सिस्टीम कार्यान्वित केली. नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाने तयार केलेल्या या यंत्रणेच्या वापरातूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्याचे ठरले; पण नेहमीप्रमाणे त्याकडे फारसे बारकाईने पाहिले गेले नाही.
ही उपग्रहाशी संलग्न कार्यप्रणाली असल्याने तिचा महापूरकाळात प्रभावीपणे वापर होऊ शकतो; पण केवळ दुर्लक्षामुळे गेल्या वर्षी धरणांतील विसर्गाचे नियोजन चुकले. त्यातून भीमा-कृष्णा खोऱ्याला महापुराचा जोरदार फटका सहन करावा लागला.
रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा जसा या महापुराला कारणीभूत आहे, तसाच धरणांतील विसर्गही कारणीभूत असल्याचे निरीक्षण महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने नोंदवल्यानंतर ही आटीडीए यंत्रणा नव्याने अभ्यासण्यास सुरुवात झाली आहे.
वडनेरे समिती शिफारशीबाबत शासन निर्देशच नाहीत
वडनेरे समितीने धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणा असे निर्देश शासनाकडून जलसंपदा विभागाला देणे गरजेचे आहे; पण अहवाल येऊन महिना होत आला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. आता तर पावसाळा सुरू झाला आहे.
लघू प्रकल्प भरून वाहू लागले आहेत, तर मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत किमान ३० ते ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता वडनेरे समितीच्या शिफारशींची वाट न पाहता आतापर्यंत वापरत असलेल्या यंत्रणेचाच वापर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटबंधारेच्या सूत्रांनी सांगितले.
विसर्गाची माहिती दर १५ मिनिटांनी
आरटीडीए सिस्टीमअंतर्गत पाण्याच्या मोजमापासाठी २४९ केंद्रे कार्यान्वित केली असून, १९१ केंद्रांद्वारे पडणाऱ्या पावसाचे मोजमाप होते. पडणारा पाऊस, पाण्याचा विसर्ग यांचा दर १५ मिनिटांनी अहवाल येईल, असे नियोजन यामागे आहे. धरणातून पाणी सोडले की थेट नदीपात्रात येण्यासाठी लागणाऱ्या जवळपास ६ ते १२ तासांच्या अंतरादरम्यान पुढील हालचालींचा वेग वाढवता येतो.
यंत्रणा अजून गाफील
गेल्या वर्षीच्या महापुराचा वाईट अनुभव असल्याने यंत्रणा आतापासून सतर्क करणे अपेक्षित होते; पण एकूणच आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील हालचाली पाहिल्या तर बऱ्यापैकी शांतताच दिसत आहे. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकामची बरीचशी यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली होती.
रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय मजुरांची पाठवणी, कम्युनिटी किचन, निवारा केंद्रे, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, आदी ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मूळ कामाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. धरणांच्या सुरक्षिततेचे काम पूर्ण झाले असले तरी इतर किरकोळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.