पोलिसांच्या मारहाणीचा जुनाच व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:56+5:302020-12-28T04:12:56+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदीत फिरणाऱ्या नागरिकांना चोप देणारा बिंदू चौकातील पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदीत फिरणाऱ्या नागरिकांना चोप देणारा बिंदू चौकातील पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पोलीस दोन दुचाकीस्वारांना लाठीने अतिशय क्रूरपणे मारताना दिसत आहेत. याबाबत सत्यता पडताळली असता तो व्हिडीओ जुना असून संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खोडसाळपणाने टाकल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बिंदू चौकात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून नाहक फिरणाऱ्या वाहनधारकांना पाच ते सहा पोलिसांकडून काठीचा प्रसाद देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्याची सत्यता पडताळणी केली असता तो जुनाच असल्याचा निष्पन्न झाले आहे. सध्या दिवसभर ड्यूटी करून मोजकेच पोलीस कर्मचारी रात्री संचारबंदीत असतात. त्यात जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या फक्त दोनच पोलिसांची बिंदू चौकात रात्रीच्या वेळी ड्यूटीवर नेमणूक केलेली असते. असे असताना या व्हिडीओमध्ये पाच-सहा कर्मचारी दिसत आहेत. त्यामुळे तो जुना असृून कदाचित पहिल्या कडक लॉकडाऊनमधील असल्याचीही शक्यता पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली.
फोटो नं. २६१२२०२०-कोल-पोलीस
ओळ : हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.