जुनं ते सोनं... पण कवडीमोल दरानं !
By admin | Published: April 27, 2015 09:49 PM2015-04-27T21:49:24+5:302015-04-28T00:27:49+5:30
लाखमोलाचा ठेवा निघतोय मोडीत : तांब्या, पितळ उरलं देव्हाऱ्यापुरत; इतर भांडी घरातून हद्दपार; पारंपारिक वस्तूंना आधुनिकतेचा फटका
संतोष गुरव - कऱ्हाड
‘जुनं ते सोनं’ असं म्हणतात; पण सध्या हेच सोनं कवडीमोल दराने विकलं जातयं. एकेकाळी स्वयंपाकगृहाचा कणा असलेली तांब्या आणि पितळेची भांडी स्वयंपाकगृहातून नव्हे तर अगदी घरातूनच हद्दपार होतायत. तांब्या, पितळेची जागा आता स्टिलने घेतलीय. टिकाऊपेक्षा दिखाऊपणाला महत्व आल्याने जुनी भांडी मोडीत काढली जातायत.
ऐतिहासिक अन् पारंपारिक अशा जुन्या स्मृती ठराविक लोकांकडूनच जपल्या जातात. काही वेळा त्यांना उजाळाही देण्याचे काम केले जाते. काही ठिकाणी मात्र हाच जुना ठेवा नाहीसा करण्याचं काम केलं जातं. तांबे व पितळेची भांडी कालबाह्य झाली असल्याने मोडित घातली जात आहेत. वर्षानुवर्षे जतन करून ठेवला जाणारा लाखमोलाचा ठेवा आता मोडीत काढल्याने कालबाह्य झाला आहे. आजही ग्रामीण भागात जुन्या तांब्या-पितळ्याची भांडी क्वचितच पहायला मिळतात. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा यांचा वापर जास्त करून देवपूजा करण्यासाठीच केला जायचा. मात्र, काळाच्या ओघात ही देवपूजेची भांडी दुर्मिळ होत गेली. दुर्मिळ झालेली भांडी नंतर मोडीतच आली.
वर्षानुवर्षापासून तांब्यांचे हंडे, पातेली, ताट आदी देवपूजेसाठी तसेच संसार उपयोगी भांडी लोकांकडून वापरली जायची. मात्र बदलत्या काळानुसार प्लॅस्टिक व अॅल्युमिनिअमपासून तयार केलेली भांडी वापरात येवू लागली. तेव्हापासून ही भांडी वापराविना पडून राहू लागली. पडून राहिलेली भांडी कवडीमोल दराने मोडित काढली गेल्याने ती आता कालबाह्य झाली आहेत. लग्न समारंभात रूकवतात ठेवल्या जाणाऱ्या पितळेच्या, तांब्याच्या भांड्याची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे.
वजनाला हलके आणि स्वस्त असलेल्या स्टील व अल्युमिनियमपासून बनविण्यात आलेली ताट, वाटी, चमचा आदी भांडी लग्न, वास्तूशांत अशा कार्यक्रमांमध्ये आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र, अलिकडच्या काळात तांबे, पितळ अशा धातूंपासून तयार केलेली ताट, वाटी, चमचा, घंगाळ, तपेले, बादली, परात, कळशी, हंडा आदी भांडी कालबाह्य झाली आहेत. जुन्या परंपरेनुसार वापरात असलेल्या या भांड्यांचे दरही जास्त असल्याने त्याचा परिणाम मागणी व खरेदी या व्यवहारावरती झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात या भांड्यांच्या खरेदी व मागणीकडे लोकांकडून लक्ष दिले जात नाही.
आजच्या काळात नव्या पिढीकडून जुन्या काळातील भांडी ही जास्त दिवस न ठेवता ती मोडीस काढली जात आहेत. अशा मोडीत निघालेल्या भांड्यांना आजही बाजारपेठेत जास्त मागणी आहे.
मोडीतील तांब्यांचा वापर
मोडीत निघालेल्या तांबे धातूच्या भांड्यांचा वापर जास्त करून इलेक्ट्रीक वस्तूंसाठी केला जातो. मोडीत निघालेल्या भांड्यांवर प्रक्रिया करून त्यापासुन पंखे, वीजतारा, पवनचक्की तसेच पाण्याच्या मोटरी बनविल्या जातात. मोडीतील तांबे हे ९० टक्के इलेक्ट्रीकल कंपन्याना पाठवले जाते. त्यातील १० टक्के शिल्लक राहिलेले मोडीतील तांबे हे परत दुकानदारांना दिले जाते.
भांड्यांवर दिल्लीत प्रक्रीया
मोडीत निघालेल्या भांड्यांवर दिल्ली तसेच इतर ठिकाणी असलेल्या कंपन्यांमध्ये प्रक्रीया केली जाते. मोडीतील तांबे तसेच पितळ यांना मशीनींच्या साहाय्याने वितळवले तसेच तोडले जाते. प्रक्रियेनंतर त्यापासून पंखे तसेच पवनचक्कीसाठी वायर तयार केल्या जातात.
भांड्यांच्या मोडीची पध्दत
भांड्याच्या दुकानात तांबे तसेच पितळपासून तयार केलेल्या भांड्यांची मोड ठरावीक पध्दतीनुसार केली जाते. मोडीचा दर हा बाजारपेठांमध्ये एक ते दोन दिवसांचा ठरलेला असतो. बाहेरच्या देशातून तांबे तसेच पितळ यांची आवक जास्त झाली तर येथील स्थानिक बाजारपेठेतही मोडीचे दर कमी होतात. किरकोळ भांडी व्यापारी दारोदारी फिरून जुन्या काळातील भांडी गोळा करणाऱ्या लोक ांकडून बाजारभावापेक्षा २० टक्के कमी फरकाने भांडी घेतात. लोकांकडून मोडीत खरेदी केलेली भांडी एजंटांना दिली जातात.देतात.
कसा चालतो व्यवहार !
शहरातील भांडी व्यापारी ग्रामीण भागातून तसेच शहरातुन मोडीत निघालेली भांडी ग्राहकांकडून विकत घेतात. त्या भांड्यांना एकत्रित केले जाते. एकत्रित केलेली भांडी पुणे, मुंबई तसेच दिल्ली याठिकाणी असलेल्या इलेक्ट्रीकल कंपन्यांना पाठवली जातात. मोडीतील भांड्याचा व्यवहार पहिल्यांदा संबंधित कंपनीचा एजंट आणि दुकानदार यांच्यात होतो. त्यानंतर कंपनीचे एजंट बाहेरील देशातील तांबे तसेच पितळ यांची आवक ग्रहीत धरून मोडीची किं मत दुकानदारांना सांगतात. भांडी व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेली भांडी एजंटामार्फ त कंपनींना पाठवली जातात.
तांब्या आणि पितळेची भांडी मोडीत घालण्याचे प्रमाण जास्त आहे. मोडीत येणाऱ्या भांड्यांमध्ये काही पुरातन भांडी असतात. काही भांड्यांचे वजन जास्त असते तर काही भांड्यांवर सुरेख नक्षिकाम केलेले असते. अशी काही भांडी आम्ही जतन करून ठेवली आहेत. भविष्यात ही भांडी पाहण्यासही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
- दिलीप तवटे,
भांडी व्यापारी, मलकापूर