बेळगावमध्ये वाढली 'ओल्डमॅन'ची क्रेझ, जाणून घ्या काय आहे अनोखी प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:06 PM2022-12-31T23:06:53+5:302022-12-31T23:08:20+5:30

बच्चेकंपनीची ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 'ओल्डमॅन'साठी सुरू असते लगबग

Oldman craze increased in Belgaum know what is the unique custom | बेळगावमध्ये वाढली 'ओल्डमॅन'ची क्रेझ, जाणून घ्या काय आहे अनोखी प्रथा

बेळगावमध्ये वाढली 'ओल्डमॅन'ची क्रेझ, जाणून घ्या काय आहे अनोखी प्रथा

Next

प्रकाश बेळगोजी, बेळगाव: डिसेंबर महिना म्हटलं कि बेळगावमधील कॅम्प परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट पाहायला मिळते. २५ डिसेंबर रोजी नाताळ साजरा झाला कि लगबग सुरु होते ती 'ओल्डमॅन' बनविण्याची. ३१ डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप देताना 'ओल्डमॅन' प्रतिकृतीचे दहन केले  जाते. जुन्या साऱ्या गोष्टी मागे सारून नव्याने, आनंदाने नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करणे हि भावना या 'ओल्डमॅन' प्रतिकृती दहनामागची असते. ओल्डमॅन दहन करण्याची प्रथा सर्वाधिक बेळगावमध्ये आढळून येते. महाराष्ट्रातील काही भागात क्वचित आढळून येणारी हि प्रथा बेळगावमधील कॅम्प परिसरात जल्लोषात पार पडली जाते. प्रामुख्याने ख्रिस्ती बांधव हि प्रथा पाळतात. मात्र अलीकडे प्रत्येक गल्लोगल्ली बच्चे कंपनीकडून आनंद, उत्साह म्हणून ओल्डमॅन दहन केला जात आहे.

बेळगावमध्ये विशेषतः बच्चेकंपनीची ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 'ओल्डमॅन'साठी लगबग सुरु असते. सर्वाधिक उंचीचे ओल्डमॅन बनविण्याची क्रेझ अलीकडे वाढली असून साधारण ३ फुटपासून ते २५ फुटापर्यंतचे ओल्डमॅन बनविले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅम्प परिसरातील गवळी गल्ली युवक मंडळातील तरुण ओल्डमॅन बनविण्यात व्यस्त असून आज थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर ओल्डमॅनची विक्री देखील होत आहे. तयार ओल्डमॅनसाठी यंदा बाजारपेठेत मागणी वाढली असून साधारण ५०० ते ५००० रुपयापर्यंतचे विविध पात्रातील, विविध स्वरूपातील आकर्षक असे ओल्डमॅन तयार करण्यात आले आहेत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविड विषाणूवर आधारित ओल्डमॅन यंदा लक्षवेधी ठरत आहे. गेल्या २-३ वर्षात कोविडमुळे हैराण झालेल्या देशवासीयांची नव्या वर्षात कोविड पासून सुटका व्हावी यासाठी कोविडरुपी ओल्डमॅन बनवून त्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती गवळी गल्ली युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु असलेली हि प्रथा आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली जात आहे. 

लाकूड, रबर, बांबू, दोरा, गवत, विविध प्रकारचे रंगीबेरंगी कागद, खळ यासह अनेक साहित्यापासून बनविण्यात येणाऱ्या ओल्डमॅनसाठी १० दिवस परिश्रम घ्यावे लागतात. कॅम्पमधील कांबळे आणि मोरे या दोन कुटुंबियांकडून यंदा अधिकाधिक ओल्डमॅन बनविण्यात आले आहेत. ४ फुटांपासून २५ फुटांपर्यंत विविध कार्टून पात्रांच्या वेशातील ओल्डमॅन ५०० ते ५००० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  सकाळपासून ओल्डमॅन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग देखील सुरु झाली असून रात्री १२ च्या दरम्यान नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी बेळगावमध्ये पूर्णत्वास आली आहे.

Web Title: Oldman craze increased in Belgaum know what is the unique custom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.