कोल्हापुरातही ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज सज्ज; पुणे, मुंबई, नवी दिल्लीला सरावासाठी जाणाऱ्या नेमबाजांचा खर्च वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:19 PM2023-05-12T14:19:43+5:302023-05-12T14:35:59+5:30
दिव्यांग नेमबाजांकरिता लिफ्टचीही सोय व संपूर्ण रेंज वातानुकूलित आणि प्रेक्षक गॅलरीसह सज्ज
कोल्हापूर : कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलात ऑलिम्पिक दर्जाची इलेक्ट्राॅनिक टार्गेटसह ५०, २५ आणि १० मीटरची शूटिंग रेंज सुसज्ज झाली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पुणे, मुंबई, नवी दिल्ली येथे सरावासाठी जाणाऱ्यांना कोल्हापुरातच ऑलिम्पिक दर्जाची सुविधा या शूटिंग रेंजवर मिळणार आहे. विशेष म्हणजे आपल्यासारखे नेमबाज घडावेत, या उद्देशाने ऑलिम्पियन आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कोल्हापूरचा क्रीडा नगरी म्हणून देशभरात गवगवा आहे. यात नेमबाजीचा टक्का मोठा आहे. तेजस्विनी सावंत हिने विश्वचषक, काॅमन वेल्थ, ५० मीटर रायफल, थ्री पोझिशन, १० मीटर एअर रायफल , प्रोन आदी प्रकारांत जागतिक पातळीवर विजेतेपद पटकावून सुवर्णपदकांची लयलूट केली. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत राही सरनोबत हिनेही विश्वचषक, काॅमनवेल्थ, आशियाईमध्ये पिस्टलमध्ये सुवर्णमयी कामगिरी केली. लंडन ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली.
या दोघींनी सुरुवात महापालिकेच्या दुधाळी शूटिंग रेंजवर केली. ही बाब जाणून या दोघींनी कोल्हापूरप्रती उत्तरदायित्व म्हणून आपल्याप्रमाणे अन्य नेमबाजही घडावेत, त्यांना घरच्या शूटिंग रेंजवर कमी खर्चात सराव करता यावा. या उद्देशाने कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंजची मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती. त्यासाठी सरकारने हव्या त्या सुविधाही पुरविल्या. त्यामुळे ही सुसज्ज अशी शूटिंग रेंज आकारास आली आहे. पॅरा ऑलिम्पियन स्वरूप उन्हाळकर, युवा ऑलिम्पियन शाहू माने, तेजस कुसाळे ,अभिज्ञा पाटील हेही आंतरराष्ट्रीय नेमबाजीत चमकदार कामगिरी करीत आहेत.
शूटींग रेंज अशी,
या रेंजवर ५० मीटर रेंजवर ७ , तर २५ मीटरला ५ आणि १० मीटरला १५ जर्मनी बनावटीची इलेक्ट्राॅनिक टार्गेट स्कोअरिंग मशीन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे लक्ष्य अचूक साधता येणार आहे. दिव्यांग नेमबाजांकरिता लिफ्टचीही सोय व संपूर्ण रेंज वातानुकूलित आणि प्रेक्षक गॅलरीसह सज्ज झाली आहे.
यापूर्वी पेपर टार्गेट वापरले जात होते. आता इलेक्ट्राॅनिक टार्गेट स्कोअरिंग मशीनवर सराव आणि राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धाही येथे घेता येणार आहे. - सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी, कोल्हापूर