मोठा दिलासा! कोल्हापुरातील 'तो' दहा वर्षाचा मुलगा 'ओमायक्रॉन' निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 07:18 PM2021-12-18T19:18:47+5:302021-12-18T19:32:25+5:30
या मुलांचा अहवाल ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : येथील हिंमतबहाद्दर परिसरात ऑस्ट्रेलियातून आलेल्या दहा वर्षाचा मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्या मुलाचा स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. आज शनिवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा अहवाल डेल्टा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसह कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला.
मूळचे कोल्हापूरचे असलेले तसेच व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पाच व्यक्ती ३ डिसेंबरला भारतात आल्या. विमानतळावर या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर त्यांना विमानतळावरून सोडण्यात आले.
कोल्हापूर शहरात या पाचही व्यक्ती पोहचल्यानंतर त्यांची माहिती राज्य आरोग्य यंत्रणेने महानगरपालिका प्रशासनास कळविली. दि. ८ डिसेंबरला महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे तर दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी (दि १३ डिसेंबर) स्पष्ट झाले.
ते परदेशातून आले असल्यामुळे त्याची शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे ओमायक्रॉन संशयित म्हणून चाचणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो ओमायक्रॉन' निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.