शिवाजी विद्यापीठाच्या उद्यापासून होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:44 PM2022-06-24T17:44:22+5:302022-06-24T18:22:44+5:30
सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा उद्या, शनिवारपासून प्रारंभ होणार होता. मात्र, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही आहेत. त्यांनी या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन केले. त्यावर विद्यापीठाने सर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. गेल्या आठवड्यापासून त्यांनी लढ्याची तीव्रता वाढविली. त्यावर विद्यापीठाने गुरूवारी सायंकाळी अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू, तर उर्वरीत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन वर्णनात्मक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मात्र, विद्यार्थी संघटना सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्या. सर्व विद्यार्थी संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांची मागणी सोमवारी विद्या परिषद या अधिकारमंडळासमोर विद्यापीठ प्रशासनाकडून ठेवण्यात येणार आहे. त्यातील निर्णयानंतर परीक्षेचे स्वरूप आणि सुधारित वेळापत्रक जाहीर होणार आहे.