kolhapur- गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्तीबांधवांची कारागृहातील बंदीजनांसाठी प्रार्थना, बेघरांना वस्तूंचे वाटप
By संदीप आडनाईक | Published: April 7, 2023 05:11 PM2023-04-07T17:11:13+5:302023-04-07T17:11:39+5:30
कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांचा पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे हा सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापूरातील न्यू शाहूपुरी ...
कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांचा पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे हा सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापूरातील न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च, नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे उपासना देवालय, सेवन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च यांसह शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडेची प्रार्थना केली.
प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात उद्गारांवर आधारित उपदेश यावेळी विविध चर्चमधून देण्यात आला. क्वायर ग्रुपकडून गुड फ्रायडेची विशेष स्तुतीपर गीतेही यावेळी गाण्यात आली. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सकाळी इंग्रजीतून भक्ती घेतल्यानंतर मुंबईहून आलेले विशेष प्रवचनकार रेव्हरंड बिशप शिरिष आहाळे यांनी मुख्य संदेश दिला. या विशेष प्रार्थनेसाठी चर्चच्या आवारात स्क्रीनची व्यवस्था केली होती.
यावेळी रेव्हरंड डी. बी. समुद्रे, सियोन काळे, अशोक गायकवाड, आनंद म्हाळुगेकर, विक्रम चोपडे, सुलभा जाधव, मनीषा गायकवाड, रजनीकांत चोरगे, संदीप थोरात, अमोस अष्टेकर, अतुल रुकडीकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी कळंबा कारागृहातील बंदीजनांसाठी आनंद म्हाळुंगेकर, सियोन काळे यांनी प्रार्थना म्हटली. आज, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता पुण्याच्या अमित त्रिभुवन यांच्या क्रूसाच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे.
नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्चमध्ये अहमदनगर येथील रेव्हरंड अभिजित तूपसुंदरे यांनी विशेष सात उद्गारांवरील संदेश दिला. डॉ. सुशील कांबळे यांनी भक्ती सांगितली. याशिवाय कोल्हापूर जिल्हा ख्रिस्ती संघ आणि कोल्हापूर युवक ख्रिस्ती मंचतर्फे विशेष प्रार्थना घेण्यात आल्या. विक्रमनगर चर्च येथे मेघनाथ पवार, संजय धनवडे यांनी उपदेश केला.
ख्रिश्चन एकता मंचतर्फे एकटी आणि बेघर अनाथ संस्था तसेच वीटभट्टी कामगारांसाठी प्रार्थना म्हणण्यात आली. त्यांना फळांचे वाटप आणि गरजेच्या वस्तूही देण्यात आल्या. यावेळी जिझस हा चित्रपट दाखवण्यात आला. तसेच गिडिओंसमार्फत नवा करार देण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष अमित भोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जॉन विजय भोरे, पास्टर जोशूवा सावंत, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पियूष रुकडीकर, अमोस मस्के, मदन मोरे उपस्थित होते.