‘लोकमत’वर वर्धापनदिनी शुभेच्छांच्या ‘श्रावणसरी’, वाचकांनी दिले भक्कम पाठबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:31 PM2023-08-21T12:31:20+5:302023-08-21T12:33:18+5:30

‘लोकमत’ कोल्हापूरच्या समाजजीवनात रुजल्याचेच प्रत्यंतर

On the 19th anniversary of Kolhapur Lokmat, Strong support from readers | ‘लोकमत’वर वर्धापनदिनी शुभेच्छांच्या ‘श्रावणसरी’, वाचकांनी दिले भक्कम पाठबळ 

छाया - आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लोकजीवनाचे खरेखुरे प्रतिबिंब बनलेल्या कोल्हापूर ‘लोकमत’च्या १९ व्या वर्धापनदिनी वाचकांनी येथील महासैनिक दरबार हॉलवर अगत्याने उपस्थिती दर्शवत रविवारी शुभेच्छांच्या श्रावणसरींचा अनुभव दिला. संध्याकाळी पाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वच स्तरांतील मान्यवरांपासून ते सामान्य वाचकांपर्यंत अनेकांनी महासैनिक दरबार हॉलवर उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस शुभेेच्छांचे भक्कम बळ दिले. कोल्हापूरच्या समाजजीवनात ‘लोकमत’ खरोखर किती रुजला आहे, याचेच प्रत्यंतर या शुभेच्छांतून प्रत्ययास आले.

सायंकाळी पाच वाजल्यापासून स्नेहमेळावा होता; परंतू त्याच्या आधीपासूनच लोकांची रीघ लागली. बघता-बघता ही रीघ लांबच्या लांब रांगच झाली. त्या रांगेत कोल्हापूरची जडणघडण करणारे सर्वच घटक होते. विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यापर्यंत, वृत्तपत्र विक्रेत्यांपासून नामांकित डॉक्टरांपर्यंत, जाहिरात संस्थांच्या प्रतिनिधीपासून ते प्रथितयश उद्योजकांपर्यंत सर्वचजण आले. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांतील लोक, ग्रामपंचायतीपासून सेवा सोसायटीपर्यंतचे पदाधिकारी असे मान्यवर आवर्जून स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले. तुम्ही आमचे प्रश्न मांडले. ‘तुम्ही लेखनातून समाजाला दिशा देता म्हणून आम्ही आलो,’ अशा भावना बहुतेक लोकांनी व्यक्त केल्या. पावसाने विश्रांती घेतली तरी सलग चार तास शुभेच्छांच्या वर्षावात ‘लोकमत’ परिवार चिंब झाला.

गेल्या १८ वर्षांत ‘लोकमत’ने समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले, शहरास जिल्ह्याच्या ज्वलंत समस्या मांडत, त्या सुटण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रसंगी नेतेमंडळींना काही गोष्टी सुनावण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे वाचकांच्या मनात एक जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केलेल्या ‘लोकमत’च्या या वर्धापनदिन आयोजित स्नेहमेळाव्याला कर्तव्य समजून अनेकांनी हजेरी लावली. सुट्टीचा दिवस आणि अन्य कार्यक्रम असतानाही नेते, कार्यकर्ते आणि वाचक प्राधान्य देत या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिले. संपादक डॉ. वसंत भोसले आणि सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

प्रारंभी शाहू छत्रपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करण्यात आले. ‘लोकमत’च्या वर्धापनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘कोल्हापूरचे अर्थकारण’ विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, चंद्रदीप नरके, संजयबाबा घाटगे, डॉ. सुजित मिणचेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, व्ही. बी. पाटील, ताराराणी विद्यापीठाचे क्रांतिकुमार पाटील, उद्योजक आनंद माने, दिलीप मोहिते, हिंदकेसरी दीनानाथसिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. ज. ल. नागावकर, नीला नागावकर, बालरोगतज्ज्ञ मोहन पाटील, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, क्रेडाईचे विद्यानंद बेडेकर, राजीव परिख, पारस ओसवाल, स्मॅकचे सुरेंद्र जैन, दीपक पाटील, कोल्हापूर इंंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, एम. बी. शेख, रणजित जाधव, शंकर पाटील,

शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर, ॲड. महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, राजेंद्र किंकर, धनंजय पठाडे, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अनुराधा भोसले, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, संजय पाटोळे, सुनंदा मोरे, डॉ. प्रमिला जरग, मेघा पानसरे, ज्येष्ठ आर्किटेक्ट मोहन वायचळ, व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अनेकांच्या गप्पा रंगल्या

‘लोकमत’चा वर्धापनदिन म्हणजे सर्व क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, कार्यकर्ते भेटण्याचे हक्काचे ठिकाण. त्यामुळे शुभेच्छा दिल्यानंतर विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते स्वतंत्रपणे बसून चर्चा करताना दिसून आले. ‘लोकमत’ला शुभेच्छा देतानाच अनेकांच्या गाठीभेटी होतात. त्यामुळे आम्ही आवर्जून येतो, असे काहींनी सांगितले.

Web Title: On the 19th anniversary of Kolhapur Lokmat, Strong support from readers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.