राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय?
By राजाराम लोंढे | Published: September 7, 2022 12:04 PM2022-09-07T12:04:53+5:302022-09-07T12:11:11+5:30
तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय?
कोल्हापूर : केंद्र सरकारची पी. एम. किसान पेन्शन योजनेचे पैसे नको म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अनेक वेळा अर्ज करूनही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबेनात. पात्र शेतकरी हेलपाटे मारत आहेत, त्यांना मात्र पैसे मिळेनात. खुद्द राजू शेट्टी यांनीच ‘पी. एम. किसान’ याेजनेचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
केंद्र सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. आमदार, खासदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, सुरुवातीला या निकषांची फारशी माहिती नसल्याने सरसकट सगळ्यांनीच योजनेसाठी अर्ज भरले. त्यानुसार राजू शेट्टी यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले. मात्र, योजनेचे निकष पाहून शेट्टी यांनी पेन्शन बंद करण्यासाठी अर्ज करत दोन वर्षांचे बारा हजार रुपयांचा धनादेश १३ जानेवारी २०२१ रोजी तहसीलदारांकडे दिला तरीही मे २०२२ मध्ये हप्ता जमा झाला.
लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांनी पेन्शन मिळते, असे असताना या पेन्शन योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रार करून पुन्हा पैसे जमा होतात. त्यांनी मंगळवारी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे यांची भेट घेऊन पेन्शन योजनेतून अपात्र करण्याची पुन्हा मागणी केली.
केंद्र सरकारची यंत्रणाच ठरतेय कुचकामी
मुळात पेन्शन मंजूर करणे व रद्द करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. स्थानिक चौकशी समितीने अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन बंद करा, म्हणून अहवाल दिला असतानाही पुन्हा पेन्शन जमा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. मात्र, याचे खापर स्थानिक महसूल यंत्रणेवर फोडले जात आहे.
सहा हप्त्यांचे १२ हजार रुपये आपण परत केलेलेे आहेत तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय हेच कळत नाही. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)