Kirnotsav: दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणी
By संदीप आडनाईक | Published: November 9, 2024 07:36 PM2024-11-09T19:36:34+5:302024-11-09T19:37:50+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज, शनिवारीही ढगांचा अडथळा आल्याने मावळतीची सूर्यकिरणे कशीबशी अंबाबाईच्या ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज, शनिवारीही ढगांचा अडथळा आल्याने मावळतीची सूर्यकिरणे कशीबशी अंबाबाईच्या चरणाच्या थोडी वरपर्यंतच पोहोचू शकली. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही ६२ टक्के म्हणजे अधिक असल्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमीच राहिली.
दक्षिणायणाच्या कालखंडातील पारंपरिक किरणोत्सवाचा आज, शनिवारी पहिला दिवस होता. शुक्रवारी तीन मिनिटे आधीपासून अनुवभता आलेल्या सूर्यकिरणांमध्ये पुरेशी ताकद नसल्यामुळे महाद्वारातून आत येत शेवटी देवीच्या चरणापर्यंत पोहाचलेली किरणे कमकुवत होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी अंबाबाईच्या चरणस्पर्श केलेल्या सूर्यकिरणांची तीव्रता १.६ लक्स इतकीच होती. एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीचा पडणारा प्रकाशाला एक लक्स इतके प्रमाण मोजले जाते. थंडी, हवेतील आर्द्रतेत असलेले पाण्याचे जादा प्रमाण आणि ढगाळ वातावरण यामुळे शनिवारची किरणे देवीच्या मुखकमलापर्यंत गेली नाहीत.
नेहमीप्रमाणे सूर्यकिरणे सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने गरुड मंडपाच्या मागे आली. पण त्याची तीव्रता फक्त ५२०० लक्स इतकीच होती, जी शुक्रवारी १३,००० इतकी होती. ५ वाजून ०१ मिनिटांनी किरणांनी चबुतरा पार केला, तेव्हा कालच्या ११,१०१ लक्सच्या तुलनेत त्याची तीव्रता ६३०० राहिली. ५ वाजून २३ मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत चौकात पोहोचली तेव्हा ३४३० लक्सच्या तुलनेत २४५० इतकीच तीव्रता होती. ५ वाजून ३० मिनिटांपासून सूर्यकिरणांची तीव्रता खूपच कमी होत गेली.
पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, गर्भकुटी, कटांजनापर्यंत या किरणांची तीव्रता ३.०९ इतकी कमी राहिली. अखेर ५ वाजून ४३ मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला आणि नंतर किरणे थोडी वर पोहोचली तेव्हा त्याची तीव्रता १.६ इतकीच राहिली. त्यानंतर किरणे उजवीकडे लुप्त झाली. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर-देसाई, विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, सुदर्शन निवास कुटाले उपस्थित होते.