Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:07 PM2023-10-16T12:07:04+5:302023-10-16T12:07:48+5:30

विविध रंगी फुलांची अखंड उधळण, पोलिस वाद्यवृंदाच्या सुमधुर स्वरांची झालेली उधळण, भाविकांच्या मुखातून अंबा माता की जयचा जयघोष असे उत्साही तसेच भक्तिमय वातावरण

On the first day of Navratri festival, the palanquin ceremony of Karveer Niwasini Sri Ambabai was performed in a devotional atmosphere | Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

छाया : आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : विविध रंगी फुलांची अखंड उधळण, मानाच्या गायकांनी सादर केलेली गायनसेवा, पोलिस वाद्यवृंदाच्या सुमधुर स्वरांची झालेली उधळण, पायघड्या अंथरण्यात सेवेकऱ्यांची उडालेली धांदल आणि भाविकांच्या मुखातून आपसूक उमटलेले स्वर अंबा माता की जय अशा उत्साही तसेच भक्तिमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा रविवारी रात्री पार पडला. हा पालखी सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी हजारोंचा भक्तिसागर उसळला होता.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रीमध्ये नऊ दिवस अंबाबाईचा पालखी सोहळा होत असतो. पहिल्याच दिवशी पालखी सोहळ्याला मंदिर परिसरात तसेच मंदिराच्या बाहेर देखील कोल्हापुरातील हजारो भाविक उपस्थित होते. या सोहळ्यात चैतन्यमय तसेच मंगलमय वातावरण होते.

प्रदक्षिणेस रात्री साडेनऊ वाजता गणेश मंदिराजवळ पालखीत उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पालखी व देवीचे पूजन झाले. त्यानंतर चोपदाराची ललकारी होताच पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर मानाच्या गायकांनी आपली गानसेवा सादर करण्यास सुरुवात केली. पालखी मंदिर परिक्रमेस जात असताना भाविकांकडून अखंड पुष्पवृष्टी होत होती. दर्शन घेण्याकरिता भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी ठिकठिकाणी चेंगराचेंगरी होत होती. या गर्दीवर कोणाचे नियंत्रण नसल्याने विशेषत: महिला व लहान मुलांचे खूप हाल झाले.

गरुड मंडपासमोर देवीला पोलिसांनी मानवंदना दिली. नंतर पालखीतील उत्सवमूर्ती गरुड मंडपातील सदर सिंहासनावर काही क्षण विसावा घेतला. तोफेची सलामी झाली. रात्री साडेदहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात परतली. यावेळी आरती झाली आणि पालखी सोहळ्याची सांगता झाली.
 

Web Title: On the first day of Navratri festival, the palanquin ceremony of Karveer Niwasini Sri Ambabai was performed in a devotional atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.