Navratri 2023: चौथ्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा, नवदुर्गांपैकी चौथे रूप
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 18, 2023 04:17 PM2023-10-18T16:17:37+5:302023-10-18T16:36:53+5:30
अंबाबाई उद्या देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा बांधण्यात आली. कुष्मांडा हे नवदुर्गांपैकी चौथे रूप आहे. आपल्या ईश्वरी हास्यातून या देवीने ब्रह्मांडाची रचना केली. सूर्यलोकांत तिचा निवास असून, ती तेज आणि चैतन्याने परिपूर्ण आहे. उद्या गुरुवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार आहे.
श्री कुष्मांडा देवी ही अष्टभूजादेवी असून, तिच्या हातात कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृतकलश, चक्र, गदा आहे. आतल्या हातात सर्व सिद्धी व धनसंपत्ती देणारी माळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासारखी तेजस्वी, देदीप्यमान आहे. या तेज व प्रकाशामुळे दाहीदिशा प्रकाशमान होतात. संस्कृतमध्ये कोहळ्याला कुष्मांड म्हणतात. देवीच्या होमहवनात कोहळ्याचे समर्पण केले जाते. नवरात्रोत्सवात चतुर्थीला कुष्मांडा देवीची उपासना केली जाते.
ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.
अंबाबाई देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार
नवरात्रोत्सव गुरुवारी ललिता पंचमी असून, यादिवशी अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईची उत्सवमूर्ती सकाळी १० वाजता तोफेच्या सलामीने येथे छत्रपतींच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन केले जाते. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदण्याचा विधी होतो. त्यानंतर अंबाबाईची पालखी परतीच्या मार्गाला लागते.