Kolhapur: अक्षय्यतृतियेला अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा, मूळ मूर्तीला आंब्याची रास-video
By इंदुमती सूर्यवंशी | Published: May 10, 2024 07:09 PM2024-05-10T19:09:53+5:302024-05-10T19:13:51+5:30
देवीचे हे रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतियेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वसंतोत्सव साजरा करता शुक्रवारी देवीची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. यादिवशी आंब्याला विशेष मान असल्याने मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील सालंकृत पूजा झाली. वैशाख वणव्यात झोपाळ्यावर बसून झुला घेत असलेल्या देवीचे हे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मेमधील वैशाख वणवा असला तरी हा वसंतोत्सव असतो. याकाळात प्रत्येक देवाचा दोलोत्सव म्हणजे हिंदोळ्यावरील पूजा बांधण्याची पद्धत आहे. त्यानुसार परंपरेने अक्षय्यतृतियेला अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची गरूड मंडपात हिंदोळ्यावरील मनोहारी पूजा बांधली जाते. दुपारी चार वाजता देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यातून गरूड मंडपात आणण्यात आली.
चांदीच्या सिंहासनावर अंबाबाईची मूर्ती विराजमान झाल्यानंतर झोपाळ्यासारखा तख्तपोशीला बांधण्यात आले. त्याला फुलापानांनी सजवल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधली की अंबाबाईला हळद कूंकू वाहून कैरीची डाळ आणि पन्हं यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. देवीच्या एका बाजूला हवालदार आणि दुसऱ्या बाजूला सोन्याचा दंड घेऊन देवीला हाताने झोका देत होते. वैशाख वणव्यात शांतपणे असा झुला घेत बसलेल्या अंबाबाईचे अलौकिक रुप पाहणे म्हणजे एक साेहळाच असतो.
शुक्रवार असल्याने रात्री देवीची पालखी झाल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला. दुसरीकडे देवीच्या मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील पूजा बांधण्यात आली.
गणपती चौकातून दर्शन
सध्या गरूड मंडप नाजूक अवस्थेत असल्याने तेथे कोणालाही सोडले जात नाही. तेथे फक्त अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे नित्य व नैमित्तीक धार्मिक विधी केले जातात. भाविकांना देवीची झुल्यातील पूजा पाहता यावी, दर्शन घेता यावे यासाठी गणपती मंदिराच्या मागील बाजूने भाविकांची स्वतंत्र रांग करण्यात आली होती.
मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील सालंकृत पूजा video