देशाला अनोखी मानवंदना, कोल्हापूरचे ६४ वर्षीय वृध्द नऊ तास नऊ मिनिटे ७५ किलोमीटर धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:16 PM2022-08-17T14:16:11+5:302022-08-17T14:16:36+5:30
सेवानिवृत्त झालेले महिपती संकपाळ यांना धावण्याचा छंद
कोल्हापूर : धावायला तुम्ही तरुणच असायला पाहिजे असं काही नाही. तुमची इच्छा असेल, संकल्प असेल आणि विशेष म्हणजे तुमचे मन तरुण असेल तर धावणं शक्य आहे. याचीच प्रचिती सोमवारी ६४ वर्षीय महिपती शंकर संकपाळ यांच्या उपक्रमातून आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संकपाळ यांनी ७५ किलोमीटरचे अंतर नऊ तास नऊ मिनिटात धावत पूर्ण केले.
हे ७५ किलोमीटरचे अंतर सलग धावण्याचा विक्रम कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महिपती शंकर संकपाळ यांनी पूर्ण केला. या उपक्रमासाठी संकपाळ यांनी सोमवारी शहरातील रंकाळा तलावास तब्बल नऊ तास नऊ मिनिटे, २९ सेकंदात १७ प्रदक्षिणा घातल्या. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांनी हा विक्रम करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमाराला सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला पूर्ण करण्यात आला.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना कोल्हापूर मास्टर अथलेटिक्स असोसिएशन व कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनचे बाळासाहेब भोगम, रघुनाथ लाड, धोंडीराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, नाना गवळी, अजित मोरे, उदय महाजन, उदय गायकवाड, राजेश पाटील, अविनाश बोकील इत्यादींनी प्रत्येकी २-३ प्रदक्षिणा त्यांच्यासोबत घालून त्यांना हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
संकपाळ यांना धावण्याचा छंद
- एमएसईबी वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेले महिपती संकपाळ यांना धावण्याचा छंद आहे. मूळचे वाळवा, ता. राधानगरी येथील संकपाळ पाचगाव रोडवर रहायला आहेत. वयाच्या ४५ वर्षांपासून त्यांनी हळूहळू धावण्यास सुरवात केली. ज्येष्ठांच्या अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी हिरिरीने भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत.
- ज्येष्ठांच्या एशियन चॅम्पियनशीप मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन पहिल्या पाचमध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अमृतमहोत्सवी दौडमध्ये त्यांनी भाग घेऊन त्याच दिवशी ७५ किलोमीटर धाव पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.