नवरात्रोत्सवाची लगबग; अंबाबाईच्या चांदीला झळाळी, आज सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:35 PM2022-09-23T13:35:47+5:302022-09-23T13:36:16+5:30
कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेच्या नित्य व नैमित्तिक वापरातील चांदीच्या साहित्यांना झळाळी आली. स्नानाचे घंगाळ, ...
कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेच्या नित्य व नैमित्तिक वापरातील चांदीच्या साहित्यांना झळाळी आली. स्नानाचे घंगाळ, नैवेद्याचे ताट, वाटी, आरतीचे ताट, निरांजन, धुपारती पात्र, अब्दागिरी, मोर्चेलपासून ते उत्सवमूर्तीचे सिंहासन, प्रभावळ अशा साहित्यांचा समावेश आहे. आज, शुक्रवारी देवीच्या जडावाच्या व सोन्याच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता केली जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मांडव उभारण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वर्षातून एकदा अंबाबाई पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्यांची स्वच्छता केली जाते. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक व कारागीर ही सेवा मोफत देतात. गुरुवारी सकाळी चांदीच्या साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये नगरप्रदक्षिणेसाठीचे चांदीचे सिंहासन, चौरंग, चौऱ्या-मोर्चेलचा समावेश आहे तसेच नैवेद्याचे ताट, कटांजन, आरतीचे ताट, घंगाळ, वाट्या, तांबे, तोरण, चोपदार दंड यांची स्वच्छता झाली. सायंकाळपर्यंत ही स्वच्छता सुरू होती.
दोन वर्षांनी होणार सांस्कृतिक कार्यक्रम
कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दोन वर्षे नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत. यंदा मात्र देवीचा उत्सव जल्लोषात साजरा होत असून त्यासाठी नऊ दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची यादी तयार करण्यात आली आहे. मंदिरत परिसरातील देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर त्यासाठी मांडव उभारला जात आहे.
महालक्ष्मी धर्मशाळा व अन्नछत्र सज्ज...
अंबाबाईच्या परस्थ भक्तांसाठी निवास व महाप्रसादाची सोय करणारे श्री महालक्ष्मी धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र या दोन्ही संस्था नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. यंदा भाविकांची संख्या वाढणार हे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. धर्मशाळेत ७०० ते १००० भाविकांची सोय होणार असून ते २४ तास सुरू राहणार आहे. महालक्ष्मी अन्नछत्रमध्ये रोज १० हजार भाविक भोजन प्रसाद घेतील याची व्यवस्था केली आहे तसेच अन्नछत्राची वेळ वाढविण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली.
मांडव उभारणी
अंबाबाई भक्तांना उन्हाचे चटके लागू नयेत यासाठी पूर्व दरवाज्यातून गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या दर्शनरांगांवर मांडव उभारला जात आहे. यासह परिसरातील हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. मणिकर्णिका कुंडाच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने कुंडाचीही गुरुवारी स्वच्छता करण्यात आली.