कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांना अनोखे अभिवादन, १२ तासांत १०२ किलो तांदळातून रेखाटली भव्य रांगोळी
By संदीप आडनाईक | Published: May 6, 2024 03:20 PM2024-05-06T15:20:15+5:302024-05-06T15:21:04+5:30
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सोमवारी टाऊन हॉल येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सोमवारी टाऊन हॉल येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर राज्यभरातून आलेल्या शाहूप्रेमींनी दिवसभर अभिवादन केले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचेही अनेकांनी दर्शन घेतले.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहूंच्या समाधी स्थळांवर सोमवारी सकाळी शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्विनी राजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. शाहू सलोखा मंचाच्या वतीने १०२ सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना सहसंपर्क नेते विजय देवणे, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळिक, निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बी. एल. बरगे, मेघा पानसरे, रघू कांबळे माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, उपस्थित होते.
१०२ किलो तांदळातून रांगोळी
शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा प्रसार केला, तसेच शेती आणि शेतकऱ्याला महत्त्व दिले म्हणून बीडचा कलाकार उद्देश गोवर्धन पघळ यांनी समाधी स्थळ परिसरात १२ तासांत १०२ किलो तांदळातून शाहू महाराजांची प्रतिमा असलेली भव्य रांगोळी काढली. त्याला विजय सगर, विश्वविजय कांबळे, रोहित कांबळे, अजिंक्य घाडगे, रतन सूर्यवंशी यांनी मदत केली. शाहू छत्रपतींसह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार ऋतुराज पाटील, संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले.
व्हिडीओद्वारे रेखावार यांनी वाहिली आदरांजली
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही कोल्हापुरातून बदली झाली तरी सोमवारी सकाळी त्यांनी सीए आदित्य बेडेकर यांच्या मोबाइलवरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाहू यांना आदरांजली वाहिली.