श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह
By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 22, 2024 07:31 PM2024-01-22T19:31:40+5:302024-01-22T19:32:56+5:30
दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
कोल्हापूर : अयोध्येत श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्रीराम रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. शेजारी सीता, लक्ष्मण आणि खाली श्री हनुमान हात जोडून पाया पडत असलेल्या रुपात ही पूजा होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मंदिर परिसर व बिंदू चौकातील एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
देशात सर्वत्र श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह असताना साडेतीन शक्तीपीठातील श्री अंबाबाईची विशेष पूजा बांधण्यात आली. दख्खनचा राजा श्री जोतिबाचीदेखील श्रीरामाच्या रुपात पूजा बांधली होती. त्र्यंबोली देवीची श्री रामाचे पूजन करत असलेल्या रुपातील पूजा होती. दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते भाविकांना शिरा, दुध व लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी, संजय जोशी, राजू सुगंधी, तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत.े