जातीयवादाने छळलं.. पण माणुसकी धर्माने तारलं; कोल्हापुरात लढवय्या स्त्रीयांनी मांडला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:56 IST2025-02-21T12:55:18+5:302025-02-21T12:56:00+5:30
शांतीसाठी स्त्री संघर्षचे आयोजन

जातीयवादाने छळलं.. पण माणुसकी धर्माने तारलं; कोल्हापुरात लढवय्या स्त्रीयांनी मांडला संघर्ष
कोल्हापूर : जातीयवादातून झालेल्या दंगलीत नवऱ्याचा बळी गेला.. त्यांचे राजकारण झाले; पण आम्ही होरपळून गेलो. शिक्षकांनी फक्त अभ्यासक्रम घ्यायचा मुलांच्या सामाजिक, माणुसकीच्या जाणिवा समृद्ध करायच्या की, त्यांच्यामध्ये धर्माबाबत असलेल्या द्वेषाला मुरू द्यायचे?, हिंसाचारानंतर गजापूरमधील महिलांची नागरिकांची आज अवस्था आहे, गोविंद पानसरेंसह पुरोगामी नेत्यांच्या हत्येला १० वर्षे झाली तरी खुन्यांना शिक्षा होत नाही.. या वातावरणाने आम्ही निराश आहोत पण हरलेलो नाही, एकदिवस नक्की जिंकू असा विश्वास लढवय्या महिलांनी गुरुवारी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नेत गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतीसाठी स्त्री संघर्ष संस्थेच्या वतीने शाहू स्मारक भवनात झालेल्या चर्चासत्रात पुसेसावळी येथील दंगलीत मृत्यू झालेल्या नूरहसन शिकलगार यांची पत्नी आयेशा शिकलगार, प्रा. तेजस्विनी देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रेहाना मुरसल, मेघा पानसरे यांनी विद्वेषाचे राजकारण यावरील चर्चासत्रात अनुभव मांडले. संग्राम संस्थेच्या मीना शेषू व प्रा. मंजुश्री पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आयेशा शिकलगार म्हणाल्या, हिंसेत जमावाला माणुसकी नसते. या लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नाही का असा प्रश्न पडतो. प्रा. तेजस्विनी देसाई म्हणाल्या, कोल्हापूर ही पुरोगामी शाहूंची नगरी असताना इथे धार्मिक विद्वेश, दंगली होत आहे हे दु:खद आहे. शिक्षकांनी मुलांना योग्य अयोग्य, चांगले वाईट, प्रेम द्वेष. सद्विचार विवेक यांची शिकवण दिली नाही तर शिक्षक म्हणून काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न पडतो.
मीना शेषू यांनी प्रास्ताविकात ते आमचे नाहीत ही भावना, पूर्वग्रहदूषितता यामुळे द्वेषाची भावना वाढते, असे सांगितले. रेहाना मुरसल यांनी विशाळगडावरील दंगलीनंतर सध्या तेथील नागरिकांची अवस्था सांगितली. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा मेहता, सीमा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अंतर्मुख करणारा चार बाय तीन नाट्याविष्कार
चर्चासत्रापूर्वी रेखा ठाकूर संकल्पित व अभिनित चार बाय तीन हा एकपात्री नाट्याविष्कार सादर झाला. रंवाडा देशात १९९४ साली झालेल्या नरसंहारात होरपळलेली तरुणी तब्बल ९० दिवस चार बाय तीन फुटाच्या बाथरूममध्ये आणखी सात महिलांसोबत अडकून पडते. त्यावेळी झालेली तिची मन:स्थिती रेखा यांनी या नाट्याविष्कारातून मांडली. तिच्या मनाची अवस्था सर्वांना अंतर्बाह्य हलवून टाकते.