महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?, स्थानिक वाहनांच्या वर्दळीने महामार्गावरील गतीला ब्रेक

By उद्धव गोडसे | Published: August 30, 2023 01:53 PM2023-08-30T13:53:59+5:302023-08-30T13:54:25+5:30

दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास, सलग सेवा मार्गांची गरज

On the Pune-Bengaluru highway between Kagal and Shendri traffic on the highway was disrupted due to rush of local vehicles | महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?, स्थानिक वाहनांच्या वर्दळीने महामार्गावरील गतीला ब्रेक

महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?, स्थानिक वाहनांच्या वर्दळीने महामार्गावरील गतीला ब्रेक

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू महामार्गावर कागल ते शेंद्री यादरम्यान कागल ते पेठनाका या ६२ किलोमीटर अंतरात औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, बाजारपेठा आणि मोठ्या गावांची संख्या जास्त आहे. स्थानिकांच्या वाहनांची वाढती वर्दळ आणि सेवा रस्त्यांचा अभाव यामुळे महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. परिणामी अपघातांचा धोका वाढून महामार्गाची गती मंदावते.

कागल ते सातारा हा दक्षिण महाराष्ट्रातील सुपिक पट्टा असल्याने या परिसरात नागरिकरण वाढले आहे. कराड, इस्लामपूर, वाठार, कोल्हापूर, कागल यासह महामार्गापासून पाच-दहा किलोमीटर अंतरावर अनेक मोठी गावे आहेत. औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, दगड खाणी, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळे यांची रेलचेल असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. सध्याच्या चौपदरी महामार्गाला अपवाद वगळता सेवा मार्ग नाहीत. त्यामुळे सायकल, बैलगाडीपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्वच वाहने एकाच मार्गावरून जातात. यातच अशास्त्रीय तीव्र वळणे, बेदरकार वाहतूक, चुकीचे पार्किंग, उलट्या दिशेने होणारी वाहतूक, बोगदे आणि उड्डाण पुलांचा अभाव यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत.

गोकुळ शिरगाव ते अंबप फाटा यादरम्यान काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी सेवा रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. विशेषत: शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगाव परिसरात हा प्रश्न गंभीर आहे. ट्रान्सपोर्ट कंपन्यांची अवजड वाहने, खासगी ट्रॅव्हल्स, क्रेन, वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज, हॉटेल्स यांचे पार्किंग सर्व्हिस रोडवरच आहे. सेवा रस्त्यांचा वापर करता येत नसल्याने स्थानिक नागरिक महामार्गाचा वापर करतात. यातच आता महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

दुचाकीस्वारांची वाढती संख्या

औद्योगिक वसाहती आणि शहरांमधील रोजगाराच्या निमित्ताने रोज हजारो दुचाकीस्वार महामार्गावरून प्रवास करतात. सेवा रस्ते नसल्यामुळे त्यांना महामार्गावरूनच जावे लागते. कागल ते वाठार यादरम्यान दुचाकीस्वारांचे प्रमाण मोठे आहे. वाठारपासून पुढे दुचाकींचे प्रमाण कमी होते. मात्र, यादरम्यान त्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

ब्लॅक स्पॉट ठरले जीवघेणे

महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान लक्ष्मी टेकडी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, घुणकी फाटा हे ब्लॅक स्पॉट आहेत. सदोष रस्ते आणि बेदरकार वाहतूक यामुळे ब्लॅक स्पॉटवरील अपघात नित्याचेच ठरले आहेत. सहा पदरीकरणाच्या कामात ब्लॅक स्पॉट काढण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.

व्यावसायिक वाहनांची वर्दळ

औद्योगिक वसाहतींमध्ये येणारी अवजड वाहने, स्थानिक पातळीवर होणारी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक, साखर हंगामात उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या, प्रवासी रिक्षा यासह अन्य व्यावसायिक वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर आहे. काही गावांचे आठवडी बाजार महामार्गालगत भरतात. मंगल कार्यालये, वाहनांचे शोरूम्स, गॅरेजची वाहने सेवा रस्त्यांवरच असतात. यांचा अडथळा वाहतुकीला होतो. 

...तर होऊ शकतो विनाअडथळा प्रवास

कर्नाटकातून वेगाने आलेल्या वाहनांची गती कागलजवळ मंदावते. पुढे शेंद्रीपर्यंत जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. तीच स्थिती साता-याकडून येताना शेंद्री ते कागलदरम्यान असते. रुंदीकरणानंतर स्थानिक वाहतूक सेवा मार्गावर वळवल्यास महामार्गावरील वाहतुकीला अडथळा राहणार नाही. त्यामुळे प्रवास गतिमान आणि विनाअडथळा होऊ शकतो.

अपघातांचे बळी दुचाकीस्वार

महामार्गावर होणा-या अपघातांमध्ये बहुतांश अपघात दुचाकीस्वारांचे अहेत. दुचाकी घसरून पडणे, इतर वाहनांची दुचाकीला धडक बसणे, रस्ता ओलांडताना अवजड वाहनांनी दुचाकींना उडवणे अशा अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अपघाती मृत्यूंमध्ये ८० टक्के दुचाकीस्वारांचा समावेश असतो. 

उपाययोजना काय?

  • सहापदरीकरण आणि सेवा रस्ते तयार करणे
  • गर्दीच्या ठिकाणी प्रशस्त बोगदे आणि उड्डाण पुलांची निर्मिती
  • स्थानिक वाहतुकीला महामार्गावर प्रवेशबंदी
  • महामार्गावर स्वतंत्र बस स्टॉप, ट्रक स्टॉप तयार करणे
  • ब्लॅक स्पॉटच्या सुधारणा

सर्व्हिस रोड नसल्यामुळे आम्हाला महामार्गावरून प्रवास करावा लागतो. गावांना जोडणारे पुरेसे बोगदे नाहीत. महामार्गालगत असलेल्या गावांची रचना लक्षात घेऊन काम झाले नाही. जवळ असलेल्या शाळा, कॉलेज, बाजारपेठा, एमआयडीसी यांचा विचार करून सर्व्हिस रोड तयार होणे गरजेचे होते. - नितीन नलवडे - व्यावसायिक - टोप
 

मी रोज गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून दुधाचा टँकर घेऊन महामार्गावरून मुंबईला जातो. कराडपर्यंत जाण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो. येतानाही अशीच स्थिती असते. आता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून टँकर चालवणे आणखी धोक्याचे बनले आहे. स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र सेवा मार्ग नसल्यामुळे हा धोका वाढला आहे. - उत्तम जाधव - टँकर चालक

Web Title: On the Pune-Bengaluru highway between Kagal and Shendri traffic on the highway was disrupted due to rush of local vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.