Kolhapur: किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांचा अडथळा, सुर्यकिरणे अंबाबाई देवीच्या पितळी उंबरठ्यापर्यंत
By सचिन भोसले | Published: November 9, 2023 06:52 PM2023-11-09T18:52:28+5:302023-11-09T18:52:48+5:30
कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत ...
कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत पोहचण्यात ढगांचा अडथळा प्रमुख कारण ठरले.
दक्षिणायन किरणोत्सवास काल,बुधवारी(दि.८) पासून सुरुवात झाली आहे. हा किरणोत्सव सोमवारी (दि.१३) पर्यंत असणार आहे. पहिल्या दिवशी किरणे देवीच्या संगमरवरी पायऱ्यांपर्यंत पोहचून लुप्त झाली. तर दुसऱ्या दिवशी आज, गुरुवारी सकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. यात दुपारनंतर सुधारणा झाली किरणांची तीव्रता वाढली. त्यामुळे दुपारी पावणेपाच वाजता किरणे महाद्वारातून मंदीरात पोहचली.
त्यानंतर हवेतील आर्द्रता अचानकपणे वाढली आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले. याचा एकत्रित परिणाम किरणे देवीच्या गाभारापर्यंत पोहचलीच नाही. ही किरणे केवळ पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. दुसऱ्या दिवशीही भक्तांचा हिरमोड झाला. आता पुढील चार दिवस हा किरणोत्सव असणार आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत पुर्ण क्षमतेने किरणे देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचून हा उत्सव पुर्ण होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे व कर्मचारी आणि भक्त उपस्थित होते.
किरणांचा प्रवास असा
- महाद्वार- ४.४५ वाजता मंदीरात प्रवेश
- गरुड मंडपात- ५.०० वाजता पोहचली.
- गरुड मंडप चौथारा- ५-०५ मिनिटांनी पोहचली.
- गरुड मंडप जिना- ५.०७ मिनिटांनी पोहचली.
- गणपती मंदिर चौक- ५ वाजून २१ मिनिटांनी पोहचली.
- पितळी उंबऱठ्यापर्यंत ५ वाजून ३२ मििनटांनी पोहचली आणि तेथून पुढे ढगांचा अडथळा निर्माण झाला आणि किरणे लुप्त झाली.
किरणे देवीच्या मूर्तीवर पोहचण्यासाठी ५० ते ५५ लक्स इतकी आर्द्रता लागते. पण आज गुरुवारी ७१ लक्स इतकी म्हणजे २० टक्के जादा आर्द्रता हवेत होती. त्यात घनदाट ढग आल्याने दुसऱ्या दिवशी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंतच पोहचली. - मिलिंद कारंजकर, किरणोत्सव अभ्यासक,