Navratri 2023: सहाव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील खडी अलंकारिक पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 04:19 PM2023-10-20T16:19:09+5:302023-10-20T16:20:15+5:30
उद्या, शनिवारी जोतिबाचा जागर
अमोल शिंगे
जोतिबा: शारदीय नवरात्रोत्सावाच्या सहाव्या माळेला आज, शुक्रवारी श्री जोतिबाची कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. आज सुमारे 70 हजार भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले.
आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडल्या. श्रींचा महाभिषेक झाल्यानंतर श्रींची कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. यानंतर धुपाराती सोहळा संपन्न झाला. या धुपाराती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सर्व मनाचे गावकरी आणि सर्व देवसेवक उपस्थित होते. डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले.
उद्या, शनिवारी (दि. 21) जोतिबाचा जागर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाची तयारी सुरू असून जागरादिवशी पहाटे चार वाजल्यापासून रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात येणार आहे.