Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 5, 2024 05:05 PM2024-10-05T17:05:08+5:302024-10-05T17:06:30+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, ...

On the third occasion of Navratri festival Karveer resident Shri Ambabai is worshiped as Chandralamba Parameshwari on Saturday | Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात

Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, सलग सुट्यांमुळे शनिवारी भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम राहिला. श्रीक्षेत्र सन्मती हे कर्नाटकातील गुलबर्गा येथे असून, ते भीमा नदीच्या काठावर वसले आहे. या देवीला हिंगुळांबा किंवा भ्रमरांबा देवीदेखील म्हणतात.

श्री अंबाबाईच्या दुपारच्या आरतीनंतर देवीची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा बांधली गेली. श्रीराम लंका विजयानंतर अयोध्येत परतल्यावर विजयोत्सव साजरा केला गेला. पण त्यासाठी समुद्राला आमंत्रण न मिळाल्याने त्याने अयोध्येत येऊन श्री रामाची निर्भत्सना केली. त्यावेळी सीतामाईंनी त्याला य:कश्चित भ्रमरांकडून तुझा प्राण जाईल असा शाप दिला. पुढे शेष कन्येपासून सेतूराज जन्मला. त्याने पुढे आपल्याला शस्त्राने मरण येणार नाही असा वर मिळवला. त्यावर साधू, संत, ब्राह्मण ऋषी सती यांना त्रास दिल्यास वर नष्ट होईल, असे शंकरांनी सांगितले. पण तो उन्मत्त वागू लागला. एकदा अरण्यात फिरताना तो नारायण मुनींची पत्नी चंद्रवदनेला पाहून मोहित झाला. मुनींनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; पण निष्फळ ठरला.

 नारायण मुनींनी हिमालयात जाऊन हिंगुळा देवीला प्रसन्न केले व तिला आपल्यासोबत विनंती केली. देवी त्यांच्यासोबत निघाली व मागे फिरून न पाहण्याची आज्ञा केली. पण मुनींना आवाज येईना म्हणून त्यांनी मागे फिरून पाहिले. देवीने त्यांना आता येथेच राहून मी कार्य करेन, असे सांगितले. पण एक घट मुनींना देत तो सेतुराजाच्या प्रांगणात फोडण्यास सांगितले. मुनींनी तसे केल्यावर त्यातून पाच भ्रमर निघाले. त्यापासून असंख्य भ्रमर निघाले. त्यांच्या दंशाने राजाचे सैन्य मारले गेले. सेतूराजाने अंगाचा दाह कमी करण्यासाठी भीमा नदीत उडी घेतली व त्याचा अंत झाला. नारायण मुनींनी देवीला प्रार्थना करून सन्मती या क्षेत्री आणले व तेथे तिची स्थापना केली. हीच ही चंद्रलांबा देवी. नंतर सगळे भ्रमर देवीच्या पायात गुप्त झाले. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी बांधली.

Web Title: On the third occasion of Navratri festival Karveer resident Shri Ambabai is worshiped as Chandralamba Parameshwari on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.