'थर्टी फर्स्ट'ला पहाटे एकपर्यंत धिंगाणा, महानगरांमध्ये पाचपर्यंत रंगणार पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:00 PM2023-12-27T13:00:44+5:302023-12-27T13:03:30+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात 'या' ठिकाणी असणार तपासणी नाके

On Thirty First liquor shops will remain open till one in the morning | 'थर्टी फर्स्ट'ला पहाटे एकपर्यंत धिंगाणा, महानगरांमध्ये पाचपर्यंत रंगणार पार्टी

'थर्टी फर्स्ट'ला पहाटे एकपर्यंत धिंगाणा, महानगरांमध्ये पाचपर्यंत रंगणार पार्टी

कोल्हापूर : नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी राज्यातील मद्यविक्रीची दुकाने एक जानेवारीला पहाटे एकपर्यंत सुरू राहणार आहेत, तर महानगरांमध्ये पहाटे पाचपर्यंत परमिट रूम आणि रिसॉर्टमधील पार्टी सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला असून, याबाबतचे परिपत्रक जारी झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या स्वागताची पार्टी पहाटेपर्यंत रंगणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल्स, परमिट रुम, रिसॉर्ट सज्ज असतात. रंगीतसंगीत पार्टीचा आनंद इच्छुकांना घेता यावा, यासाठी राज्यातील मद्य विक्रीची दुकाने आणि परमिट रुम रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. महानगरे वगळता अन्य शहरांमध्ये देशी आणि विदेशी मद्याची किरकोळ विक्री करणारी दुकाने एक जानेवारीला पहाटे एकपर्यंत सुरू राहणार आहेत. 

परमिट रुम आणि रिसॉर्टमधील पार्टीसाठीही पहाटे एकपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. महानगरांमध्ये पहाटे पाचपर्यंत विक्री आणि पार्टीची वेळ राहणार आहे. यामुळे नववर्षाची पार्टी रात्री उशिरापर्यंत रंगणार आहे. तसेच मद्यविक्रीतून शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे. नाताळच्या निमित्ताने २४ आणि २५ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली होती.

इथे आहेत तपासणी नाके

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कागल, तिलारी, राधानगरी, गगनबावडा-करूळ घाट, आंबा घाट आणि अणुस्कुरा घाट येथे तपासणी नाके कार्यान्वित आहेत. याशिवाय दोन भरारी पथक जिल्ह्यात कार्यरत आहेत.

परवाना शुल्क भरा

मद्य प्राशन करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. हे परवाने वाईन शॉपी, बिअर शॉपी, परमीट रूम येथे मिळतात. एका दिवसासाठी एक ते पाच रुपये, एक वर्षासाठी १०० रुपये, तर आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये भरावे लागतात.

पार्टीसाठी परवानगी आवश्यक

३१ डिसेंबरला एक दिवस पार्टीचे आयोजन करणारे रिसॉर्ट, हॉटेल्ससाठी राज्य उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. २० हजार रुपयांचे शुल्क भरून हा परवाना दिला जातो.

अंमली पदार्थांचाही वापर

गांजा, चरस, ड्रग्ज, ब्राऊन शुगर अशा अंमली पदार्थांचाही वापर काही ठिकाणी होतो. पुणे-बेंगळुरू महामार्गासह कंदलगाव, गिरगाव, सादळे-मादळे, पन्हाळा परिसरात अशा पार्ट्या रंगतात. यावरही पोलिसांची नजर राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

अवैध दारूवर आठ पथकांची नजर

अनेक ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगतात. हॉटेल्स, परमीट रूम, रिसॉर्ट, फार्महाऊस यासह रस्सा मंडळांच्या पार्ट्यांमुळे मद्याची मागणी वाढते. अशावेळी अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आठ पथक आणि पोलिस अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून कारवाया करणार आहेत.

थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि जल्लोषी पार्ट्या हे आता समीकरणच बनले आहे. नाताळच्या सुट्यांपासूनच पार्ट्यांचा माहोल सुरू होतो. त्यामुळे मद्याची मागणी वाढलेली असते. वाढती मागणी लक्षात घेऊन या काळात बनावट मद्य, गोवा बनावटीचे अवैध मद्य छुप्या मार्गाने जिल्ह्यात आणले जाते. त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. यातून शासनाचा महसूल बुडतो, तसेच बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात सहा ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. दोन भरारी पथकांद्वारे संशयित वाहनांचा शोध घेतला जात आहे. सर्व तपासणी नाक्यांवर दोन शिफ्टमध्ये २४ तास बंदोबस्त तैनात केला आहे. एक जानेवारीपर्यंत संशयित वाहने तपासून अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखली जाईल, अशी माहिती अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली.

पोलिसांचीही अवैध दारू विक्रीवर नजर आहे. विशेषत: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांकडून अपघात होऊ नये, यासाठी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाया केल्या जात आहेत. सर्वच पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून संशयितांची तपासणी घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत.

Web Title: On Thirty First liquor shops will remain open till one in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.