महिला दिनीच महागाई विरोधात गडहिंग्लजला महिलांची निदर्शने, रस्त्यावर चूल पेटवून केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 07:19 PM2023-03-08T19:19:42+5:302023-03-08T19:20:33+5:30
गडहिंग्लज : या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पायं ! यासह महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून येथील महिलांनी ...
गडहिंग्लज : या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पायं ! यासह महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून येथील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. प्रांतकचेरीसमोर रस्त्यावरच चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला समन्वयसमितीतर्फे ही निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून देण्यात आले.
निवेदनात, आंतरधर्मीय विवाहावर नजर ठेवू पाहणारा राज्य शासनाचा जी.आर. रद्द करा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मिळणारे ५ किलो धान्य पूर्ववत द्या, शासकीय-निमशासकीय खात्यातील रिक्त जागा त्वरीत भरा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान त्वरीत द्या, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि वीजेची दरवाढ रद्द करा, शिक्षण, आरोग्य, रोजगार योजनावरील गुंतवणूक वाढवा, महिला विषयक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, वृद्ध, निराधार, विधवांची पेन्शन वाढवा, दिव्यांग महिलांच्या विकासासाठी आर्थिक निधी द्या, सरकारी जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करा, बेघरांच्या घरांसाठी जागा, घरबांधणीसाठी आर्थिक मदत करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात, कॉ. उज्वला दळवी, क्रांतीदेवी कुराडे, ऊर्मिला जोशी, छाया वडगावे, ऊर्मिला कदम, सुवर्णलता गोईलकर, सुमन सावंत, सुनिता नाईक, गीता मगदूम, अरूणा रेडेकर, सीमा जाधव, महादेवी मगदूम, कलावती गुरव, राजश्री इंदूलकर, सुला भंडारे, शारदा आजरी, कमल सुतार, शहिदा विजापुरे आदी सहभागी झाले होते.