मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली, प्रवाशांची गैरसोय वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 02:47 PM2021-08-03T14:47:29+5:302021-08-03T14:51:37+5:30
CoronaVirus Flood Kolhapur St : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस. टी. महामंडळाने बससेवा पूर्ववत केली. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील मुक्कामाच्या बसेस आगारातच ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस. टी. महामंडळाने बससेवा पूर्ववत केली. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील मुक्कामाच्या बसेस आगारातच ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
ग्रामीण भागातील व्यवहाराचे गणित एस. टी. बसेसच्या फेऱ्यांवर आधारित असते. सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे एस. टी. बसेसचे वेळापत्रक ठरलेले असते. मात्र, कोरोनामुळे या एस. टी. बसेस गावात येणेच दुरापस्त झाले आहे. त्यामुळे अनेकांचे गणितच बिघडले आहे.
ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असतात, त्या मार्गावर एस. टी.ची ये-जा मोठ्या प्रमाणात ठरलेली असते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ग्रामीण भागातील एस. टी.ची ही ये-जा कमी झाली आहे. त्यात अनेकांना सकाळी लवकर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्कामाला गावात असणारी बसही बंद झाल्यामुळे गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.
आता कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी झाले आहेत. मात्र, महामंडळाने अद्यापही नियमित फेऱ्यांसह रात्र मुक्कामाच्या बसेसही सोडाव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे हाल सुरुच
एस. टी. बसेसच्या फेऱ्यांवर अनेकांचे व्यवसाय सुरु आहेत. मात्र, बसेसच्या अनियमिततेमुळे हे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. याशिवाय मुक्कामाच्या एस. टी. बसेस बंद केल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला.
बसच्या वेळापत्रकानुसार त्या गावातील व मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्यांचे वेळापत्रक ठरत होते. त्यांच्या कामाचे नियोजनही या बसेसवर होत असे. मात्र, ती बसच बंद केल्यामुळे आता खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे.
- एकूण आगार - १२
- एकूण बसेसची संख्या - ७५०
- सुरु असलेल्या बसेस - ३५०
- आगारातच मुक्कामी असणाऱ्या बसेस - २७०
कोरोनापूर्वी १२ आगारातील तब्बल १५०हून अधिक बसेस विविध ग्रामीण भागात मुक्कामी असत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोना संसर्गानंतर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आणि जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे केवळ एकच फेरी या गावांमधून प्रवाशांच्या मागणीनुसार होत आहे. त्यामुळे बस मुक्कामी न राहता परत आगारात येत आहे.
सकाळ लवकर येणारी बस न मिळाल्याने प्रवाशांचा ओढा आता खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळू लागला आहे. हे जरी खरे असले तरी प्रवाशांचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेकवेळा या बसेस प्रतिसादाअभावी परत आगारात येत आहेत.
रुग्ण घटले, एस. टी. कधी सुरु होणार
जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात एस. टी.च्या लालपरीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या भागात एस. टी. कधी सुरु होणार, याचीच आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर बसस्थानकामध्ये विचारणा करत आहोत. कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. आता तरी एस. टी. सुरु करण्याचा विचार करा.
- ए. बी. लांडगे, गगनबावडा
शेतीसह प्रापंचिक साहित्याच्या खरेदीसाठी तालुक्याला यावे लागते. पण गावी परत जाताना खासगी वाहतुकीशिवाय आमच्याकडे पर्याय राहात नाही. बससेवा पूर्ववत केल्यास प्रवाशांचा पुन्हा ओढा वाढेल.
अनिल महाजन, राधानगरी.
प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस. टी. बसेस मुक्कामी न राहता आगारात परत येत आहेत. त्यात जिल्हा प्रशासनाचे निर्बंध असल्यामुळे दुपारी चारनंतर सर्व व्यवहार बंद होतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या अत्यल्प असते. त्याचा परिणाम सेवेवर झाला आहे. येत्या काळात सेवा पूर्ववत केली जाईल.
- शिवराज जाधव,
विभागीय वाहतूक नियंत्रक, एस. टी. महामंडळ, कोल्हापूर