‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:00 AM2019-11-12T01:00:26+5:302019-11-12T01:00:59+5:30

पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

One and a half crore rupees from 'Kadaknath' | ‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक

‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक

Next
ठळक मुद्देफलटणच्या कंपनीवर गुन्हा

सांगली : फलटण (जि. सातारा) येथील फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना एक कोटी ५४ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या कंपनीच्या अध्यक्षांसह दहाजणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक अजमुद्दीन पठाण (वय ४१, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणात ‘फूड बर्ड’चा अध्यक्ष मोहनराव भालचंद्र निंबाळकर, संचालक योगेश मोहनराव निंबाळकर, गणेश अरविंद निंबाळकर, सुनील अण्णा धायगुडे, राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे, सचिन तुकाराम करे, संजय भगवान भोरे, जॉन्सन क्रिस्तोफर रायचुरी, व्यवस्थापकीय संचालक शौकत मीरासाहेब करीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पठाण यांचे अहिल्यानगर चौकात मटण आणि चिकनचे दुकान आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांना फलटण येथील फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कडकनाथ कोंबडी पालनाबाबत माहिती मोबाईलवर मिळाली होती. गणेश निंबाळकर आणि राहुल ठोंबरे यांनी फलटण येथे बोलावून घेत त्यांना मार्गदर्शन केले होते.

गुंतवणूकदारांना फलटण येथे जाण्यास अडचण येते म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील १४० जणांनी पैसे गुंतवले होते. ती रक्कम एक कोटी ५४ लाख ६६ हजार रुपये होती. पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


गुंतवणुकीचे आमिष
कंपनीच्या एका युनिटमध्ये ७५ हजारांची गुंतवणूक केल्यास २२० कडकनाथ कोंबड्यांचे पक्षी व दहा महिन्याचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी कंपनीकडून देणार असल्याचे सांगितले होते. सभासदांकडून एक वर्षात कडकनाथ पक्ष्यांची एकूण ८५०० अंडी २ लाख ३८ हजार रुपयांना कंपनी खरेदी करणार असल्याचेही सांगितले होते. तर एक वर्षात दोन लाख ३८ हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखविण्यात आले होते.

Web Title: One and a half crore rupees from 'Kadaknath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.