दीड लाख भाविकांनी घेतला अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:53 PM2019-10-03T12:53:37+5:302019-10-03T12:57:22+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (बुधवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी गांधीजयंतीची सुट्टी असल्याने मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. एका दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची सिंहवाहिनी देवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (बुधवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी गांधीजयंतीची सुट्टी असल्याने मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. एका दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची सिंहवाहिनी देवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
रोजच्या धार्मिक विधीप्रमाणे बुधवारी सकाळी अभिषेक व दुपारची महाआरती झाल्यानंतर अंबाबाईची आदी शंकराचार्यांनी रचलेल्या यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. यमुनाष्टक म्हणजे यमुनेची स्तुती. शंकराचार्यांनी त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळात यमुनेची आठ श्लोकांमध्ये स्तुती रचली असावी. गंगेप्रमाणेच यमुनेलाही हिंदू धर्मात वेगळे महत्त्व आहे. कृष्णचरित्राशी यमुनेचा घनिष्ठ संबंध आहे. श्रीकृष्णाच्या महत्त्वाच्या लीलांची यमुना नदी साक्षी आहे. कालांतराने कृष्णसंप्रदायामध्ये यमुनेचे दैवत्व वाढीला लागून तिला समूर्त करण्यात आले. जसे गंगेचे वाहन मगर / मकर तसे यमुनेचे वाहन कासव मानले जाते.
यमुनाष्टकातील श्लोकात आदी शंकराचार्यांनी देवीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे : ‘हे देवी यमुने, तुझ्या काठी नंदनंदाच्या म्हणजेच कृष्णाच्या लीला घडल्या. तुझ्या काठी मल्लिका आणि कदंबाची फुले बहरलेली असतात. जे तुझ्या प्रवाहात स्नान करतात त्यांना तू भवसागरातून पार करतेस. हे कलिंद पर्वताच्या मुली, कालिंदी, सदैव माझ्या मनाचा कलुषितपणा तू धुऊन काढ.’ या वर्णनानुसार देवीचे बुधवारचे रूप होते. ही पूजा उमेश उदगावकर, पुरुषोत्तम ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
दरम्यान, बुधवारची सुट्टी सत्कारणी लावत परस्थ भाविक कोल्हापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटे दीड वाजल्यापासून दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारी कडक ऊन असले तरी गर्दी कमी झालेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत मंदिर व बाह्य परिसर गर्दीने फुलून गेला होता.
तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण
दरम्यान, गुरुवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला. तिरूपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवस्थान समितीकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला. समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी शालूचे पूजन केले. या शालूचा रंग पोपटी आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुलाच्या निधनाची अफवा
मंगळवारी (दि. १) रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईच्या पालखी सोहळ्यादरम्यान तोफेची सलामी देतानाचा व्हिडिओ करण्याच्या नादात करण मुकुंद पवार हा तरुण तोफेचा गोळा अंगाला घासून गेल्याने किरकोळ जखमी झाला होता. मात्र बुधवारी दुपारनंतर त्याच्या निधनाची अफवा पसरली. अखेर देवस्थान समितीने त्या मुलाचाच व्हिडिओ व्हायरल केला. ‘मी जखमी झाल्यानंतर देवस्थान समितीने माझी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. मी व्यवस्थित आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये किंवा माझ्या निधनाचा चुकीचा मेसेज पाठवू नये अन्यथा पोलीस प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असे त्याने म्हटले आहे.